वेंगुर्ला न.प.च्या इको फ्रेंडली बाप्पा स्पर्धेत ओंकार तेंडोलकर यांची बाजी

पर्यावरण पूरक गणेश सजावट स्पर्धेत हिमेश पालव प्रथम
Edited by: दिपेश परब
Published on: October 12, 2023 18:10 PM
views 155  views

वेंगुर्ला : माझी वसुंधरा अभियान ४.० व स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत पर्यावरण पूरक सण साजरे करण्याबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच हानिकारक रंगांचा, पीओपी मूर्तीचा वापर थांबवण्यासाठी व आपल्या पारंपरिक पद्धतींचा अवलंब करुन पर्यावरणाचे जतन  व संवर्धन करण्‍याच्‍या दृष्टीने वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत गणेशोत्‍सव कालावधीमध्‍ये शहरातील नागरीकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या इको फ्रेंडली बाप्‍पा स्पर्धा व पर्यावरण पूरक गणेश सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.  इको फ्रेंडली बाप्पा स्पर्धेत ओंकार तेंडोलकर तर पर्यावरण पूरक गणेश सजावट स्पर्धेत हिमेश पालव यांनी प्रथम क्रमांक पटकावला. 


   वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत विदयार्थ्‍यांसाठी १६ वर्षापर्यंत व १६  ते २१ वर्षापर्यंत अशा  दोन वयोगटामध्‍ये इको  फ्रेंडली बाप्‍पा स्पर्धा २०२३ आयोजित करण्‍यात आलेली होती.  या स्पर्धेसाठी विदयार्थ्‍यांनी नैसर्गिक मातीपासून, नैसर्गिक रंगाचा वापर करुन १५ से.मी. पेक्षा मोठी मूर्ती बनविणे अनिवार्य होते. मूर्ती बनवितानाचे फोटो तसेच व्हिडीओ वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सोशल मिडीया लिंकवर पाठविणे आवश्‍यक होते. या स्पर्धेमध्‍ये शहरातील विदयार्थ्‍यांनी मोठया संख्‍येने सहभाग घेतला होता. यात ओंकार तेंडोलकर याने प्रथम, मकरंद वेंगुर्लेकर याने द्वितीय तर सर्वेश मेस्‍त्री याने तृतीय क्रमांक पटकवला.

      तसेच शहरातील नागरीक व गणेश मंडळांसाठी  पर्यावरण संवर्धनाला चालना देणा-या नाविन्‍यपूर्ण कल्पनांना प्रोत्‍साहन देण्‍यासाठी पर्यावरण पूरक गणेश सजावट स्‍पर्धा २०२३ आयोजित करण्‍यात आलेली होती. या स्पर्धेमध्‍ये गणेश सजावटीसाठी नैसर्गिक व इको फ्रेंडली सामग्री वापरणे बंधनकारक होते तसेच थर्माकोल व सिंगल युज प्‍लॅस्‍टीक वापरण्‍यास मनाई होती. गणेश सजावटीचे फोटो तसेच व्हिडीओ वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सोशल मिडीया लिंकवर पाठविणे आवश्‍यक होते. या स्पर्धेमध्‍ये शहरातील नागरिकांनी मोठया संख्‍येने सहभाग घेतला होता. पर्यावरण पूरक गणेश सजावट स्‍पर्धा २०२३ मध्ये  हिमेश हर्षल पालव याने प्रथम क्रमांक पटकावला असून त्यांने प्लास्टिक व थर्माकोल चा वापर न करता बांबू चा वापर करून सजावट केली. श्वेता विनायक गवंडळकर हिने द्वितीय क्रमांक पटकवला असून तिने कुड्याच्या पानापासून तयार केलेल्या पत्रावळ्या व द्रोण यांचा वापर करून सजावट केली. तर भगवान धावडे यांनी तृतीय पटकवला असून यांनी सुतळीचा वापर करून सजावट केली होती.

          या स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे रोख रुपये ५५५५ , ३३३३ व २२२२ तसेच सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धांसाठी नगरपरिषदेचे स्वच्‍छता ब्रॅंड ॲम्बेसेडर प्रा. सुनिल नांदोसकर, पर्यावरण दूत डॉ. धनश्री पाटील यांनी परिक्षक म्हणून काम पाहिले. सहभागी स्पर्धकांचे मुख्‍याधिकारी परितोष कंकाळ यांनी आभार व्‍यक्‍त केले तसेच विजेत्‍यांचे अभिनंदन करुन त्‍यांच्‍या भावी वाटचालीसाठी शुभेच्‍छा दिल्‍या. या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक वितरण सोहळा लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. वेंगुर्ला नगरपरिषदेमार्फत स्वच्‍छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान या बाबत जनजागृती करण्यासाठी अशा प्रकारे विविध उपक्रम राबविण्‍यात येणार असून शहरवासियांनी वेंगुर्ला शहराचा नावलौकिक वाढविण्‍यासाठी अशाच प्रकारे उत्स्फूर्तपणे सहकार्य करावे असे आवाहन मुख्‍याधिकारी परितोष कंकाळ यांनी केले आहे.