
दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातून गोवा व बांदा पंचक्रोशीत गेले काही महिने वावरत असलेला ओंकार हत्ती पुन्हा दोडामार्ग तालुक्यातील कळणे गावात बुधवारी दाखल झाला. कळणे मायनिंग येथे दोडामार्ग बांदा मुख्य मार्गवर व मायनिंग फिरणाऱ्या ओंकारला पाहण्यासाठी कळणेसह इतर गावातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. मात्र सायंकाळी उशिरा पर्यंत ओंकार कळणे मायनिंगमध्ये घुटमळत होता.
बांदा सटमट, गाळेल येथून गोव्यात गेलेला ओंकार हत्ती आज बुधवारी दोडामार्ग कळणे येथे दाखल झाला. कळणे गावात दाखल झालेल्या ओंकारला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र वस्तीच्या ठिकाणी ओंकार असल्याने इथले ग्रामस्थही भयभीत झाले होते. ओंकार हत्तीला तिलारी खोऱ्यात घेऊन चला असे कळणेवासियांनी वनविभागाला सांगितले.
दोडामार्ग कोलझर, कळणे, डोंगरपालमार्गे गोवा - त्यानंतर मडूरा, कास, बांदा पंचक्रोशीत ओंकार हत्ती गेले काही महिने वावरत होता. याठीकाणच्या शेतकऱ्यांचे ओंकारने बऱ्याच प्रमाणात शेती बागायतीचे नुकसान केले. मात्र नुकसानी बरोबर त्याने इथल्या ग्रामस्थांसोबत मैत्री ही केली होती. आक्रमक असलेला ओंकार हंत्ती बांदा पंचक्रोशीत येऊन मानसाळलेला होता. जस गुरांना बोलवले जाते त्याप्रमाणे ओंकार हत्तीला हाक मारली की ओंकार येतो अशी त्याची इथल्या शेतकरी, ग्रामस्थांसोबत मैत्री झाली होती.
आक्रमक ओंकार हत्ती माणसाळला
दोडामार्ग तालुक्यातील तिलारी पंचक्रोशीत जन्म झालेला ओंकार हत्तीने दोडामार्ग तालुकातील तिलारी पंचक्रोशी, तळकट, कोलझर पंचक्रोशीत हैदोस घातला. शेतीबरोबर एका शेतकऱ्यांचा प्राणही घेतला. त्यानंतर तो सावंतवाडी तालुक्यातील बांदा पंचक्रोशीत गेला आणि तिथल्या ग्रामस्थान सोबत मैत्री केली आणि आपली आक्रमकता विसरला. आता काही महिन्यानंतर आता तो पुन्हा दोडामार्ग तालुक्यात दाखल झाला आहे.










