
सावंतवाडी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मृद व जलसंधारण विभागाच्या लघु पाटबंधारे योजनेतंर्गत ऑनलाईन भुमिपूजन होणार आहे. परंतु , त्या आधीच माजगाव येथील धरणाचे भूमिपूजन भाजपचे नेते, माजी आमदार राजन तेली यांनी कुदळ मारत केले. दरम्यान, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहत नारळ फोडत कोनशिलेच लोकार्पण केले. तर थोड्याच वेळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन भुमिपूजन सोहळा पार पडणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण उपस्थित असणार आहेत. एकाच धरणाचा तिसऱ्यांदा शुभारंभ होणार असल्यानं भाजप व शिवसेनेतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.
माजी आमदार राजन तेलींच्या हस्ते कुदळ मारून भुमिपूजन करण्यात आले. यावेळी माजगाव सरपंच डॉ सौ अर्चना सावंत,माजी जि. प.अध्यक्ष सौ रेश्मा सावंत, माजी नगराध्यक्ष श्री संजू परब,माजी नगरसेवक मनोज नाईक,माजी नगरसेवक आनंद नेवगी,उपसरपंच संतोष वेझारे,देवस्थान कमिटी अध्यक्ष आनंद सावंत,गाव प्रमुख आर के सावंत शेतकरी संघर्ष समिती अध्यक्ष श्री कृष्ण सावंत उर्फ बाबू सावंत ग्रामपंचायत सदस्य सौ.गीता कासार,मधू कुंभार,माधवी भोगण , भाजप सावंतवाडी मंडळ अध्यक्ष अजय गोंधावळे,अजय सावंत,सचिन बिर्जे, ऍड सचिन गावडे, ऍड शामराव सावंत आदी मान्यवर व माजगाव गावातील शेकाडो ग्रामस्थ उपस्थित होते. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर कार्यक्रम स्थळी नियोजित वेळेत न पोहोचल्यान भाजपनं आधीच कुदळ मारल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी माजगाव येथे उपस्थित राहत श्रीफळ फोडत कोनशिलेच लोकार्पण केले. याप्रसंगी माजगांव सरपंच डॉ. अर्चना सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, नारायण राणे, बाबू सावंत, सचिन वालावलकर आदी उपस्थित होते. या निमित्ताने भाजप आणि शिवसेनेतील वाद व अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. दोघांच्या शुभारंभानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तिसऱ्यांदा याच ऑनलाईन भुमिपूजन करणार आहेत. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण देखील उपस्थित राहणार आहेत.