कुंपणच खातंय शेत ; जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर ACB ची कारवाई

सिंधुदुर्गात खळबळ
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: February 04, 2025 19:25 PM
views 142  views

सिंधुदुर्गनगरी : शासकीय विभागातील आर्थिक भ्रष्टाचार रोखण्यासाठी लाच लुचपत विभाग सक्रिय आहे. मंगळवारी या विभागाचे पोलीस उपाधीक्षक अरुण पवार यांनी लावलेल्या सापळ्यात सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे दोन वरिष्ठ अधिकारी लाच स्वीकारताना रंगेहात सापडले. सिंधुदुर्गचे जिल्हा उपनिबंधक वर्ग १ माणिक भानुदास सांगळे वय ५६ व कार्यालय अधीक्षक वर्ग३ उर्मिला महादेव यादव या दोघांना ३३ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले गेले. त्यामुळे सहकारी क्षेत्रात एकच खळबळ उडाली. 

 गृहनिर्माण संस्थेच्या नोंदणी कामी यातील तक्रारदार यांचे श्री. स्वामी समर्थ गृहनिर्माण संस्था मर्यादीत, रेवतळे, मालवण, जि. सिंधुदुर्ग या गृहनिर्माण संस्थेच्या मानीव अभिहस्तांतरण आदेशाप्रमाणे अंमलबजावणी करुन जमीन संस्थेच्या नावे करणेकरिता रुपये 50,000/- रकमेच्या लाचेची मागणी करीत असलेबाबत तक्रार दिनांक 10/01/25 रोजी प्राप्त झाली होती. दि. 16/01/2025 रोजी पंचांसमक्ष करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेविका श्रीमती उर्मिला यादव यांनी तक्रारदार यांच्याकडे रुपये 40,000/- लाचेची रक्कम मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार दि. 04/02/2025 रोजी करण्यात आलेल्या दुसऱ्या पडताळणी कारवाई दरम्यान दोन्ही आरोपी लोकसेवक माणिक सांगळे यांनी तक्रारदार यांचेकडे रुपये 33,000/- लाच मागणी केली तसेच आरोपी लोकसेविका श्रीमती उर्मिला यादव ह्या तक्रारदार यांचेकडे लाचमागणी करीत असताना आरोपी लोकसेवक माणिक सांगळे यांनी तेथे हजर राहून लाच मागणीस प्रोत्साहन दिले.

दि. 04/02/2025 रोजी आरोपी लोकसेविका 2 यांनी तक्रारदार यांचेकडून मागणी केलेली लाचेची रक्कम रुपये 33,000/- पंच साक्षीदार यांचे समक्ष  तक्रारदार यांचेकडून स्वीकारताना रंगेहात पकडून ताब्यात घेण्यात आले आहे. दोन्ही आरोपी लोकसेवक यांचेविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सिंधुदुर्ग लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली.

यावेळी मनोज जिरगे, पोलीस निरीक्षक  पो.ह, जनार्दन रेवंडकर, पो.ह. रविकांत पालकर, पो.ह, प्रथमेश पोतनीस, पो.हवा विशाल नलावडे ,पो.ह., संजय वाघाटे म.पो.शि.क्र. 1579/ समिता क्षिरसागर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांचा समावेश होता. पर्यवेक्षण अधिकारी :  अरुण पवार, पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सिंधुदुर्ग  शिवराज पाटील, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्र, ठाणे. संजय गोवीलकर, अपर पोलीस अधीक्षक, प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्र, ठाणे. सुहास शिंदे, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्र, ठाणे. यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.