वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्र्यांची भेट

Edited by:
Published on: March 16, 2025 13:32 PM
views 89  views

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची गोवा येथील निवासस्थानी भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेडसावत असलेल्या वीज समस्यांचा पाढाच वाचला. गेली दोन वर्षे सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना जिल्ह्यातील समस्यांचे निवेदन कुडाळ येथील महावितरणच्या अधीक्षक अभियंता, कुडाळ कार्यकारी अभियंता, कणकवली कार्यकारी अभियंता यांना वारंवार देत आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, तत्कालीन पालकमंत्री, माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, विद्यमान खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे यांना देखील निवेदन दिले आहे. परंतु जिल्ह्यातील समस्या जशास तशा आहेत त्यामुळे जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री नाईक यांची भेट घेत जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना जिल्ह्यातील महावितरणचे अधिकारी, खासदार, आमदार यांच्यासह वीज ग्राहक संघटना पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्याचे पत्र देण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी जिल्हा वीज ग्राहक संघटना प्रभारी अध्यक्ष संजय लाड, जिल्हा समन्वयक ॲड.नंदन वेंगुर्लेकर, जिल्हा उपाध्यक्ष बाळ तथा गणेश बोर्डेकर, सहसचिव समीर शिंदे, विशाल राऊळ आदी पदाधिकारी उपस्थित होते. संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील अनेक समस्या लेखी स्वरूपात मांडण्यात आल्या असून काही प्रमुख मागण्या करण्यात आल्या. यामध्ये जिल्ह्यात लावण्यास सुरू केलेले स्मार्ट प्रीपेड मीटर लावणे बंद करणे, जिल्ह्यात जवळपास १.५० लाख मीटर बंद अवस्थेत आहेत ते बदलून देणे, ४० हजार वीज खांब गंजलेले, तुटून पडण्याच्या अवस्थेत आहेत ते तात्काळ बदलणे, वीज यंत्रणेची वेळोवेळी देखभाल दुरुस्ती करणे, संपूर्ण जिल्ह्यात आणखी १० फिडर व २० सबस्टेशनची आवश्यकता आहे ती मंजूर करून कार्यान्वित करावीत, १००kv पेक्षा कमी क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर १०० kv मध्ये बदलून घेणे. रीडिंग न घेता सरासरी वीज बिल दिले जाते, अधिकारी कर्मचारी यांची ग्राहकांशी गैरवर्तणूक, शेती पंप वीज बिल माफी यापुढेही सुरू राहावी, जिल्ह्यातील वीज वितरणाचे इन्फ्रास्ट्रक्टर मजबूत करणे, वाढविणे आदी अनेक मागण्या करण्यात आल्या. यावेळी केंद्रीय ऊर्जा मंत्री श्रीपाद नाईक यांनी जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या मागण्या प्राधान्याने राज्यातील वरिष्ठांकडे पाठवून तात्काळ कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. निवदनाची प्रत सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर यांना देखील देण्यात आली. यावेळ आमदार केसरकरांनी येत्या काही दिवसात वीज समस्येवर बैठक बोलावून योग्य ती कार्यवाही करतो असे आश्वासन दिले.