
मालवण : नौदल दिना निमित्त मालवण येथील राजकोट किल्ल्यात नौदलामार्फत उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या पायाभरणीसाठी आज मालवणात ३४ गड किल्ल्यांवरील मातीच्या कलशाची भव्य मिरवणूक काढत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन व गडकिल्ले माती अर्पण करण्यात आली. जय भवानी, जय शिवाजी... छत्रपती शिवाजी महाराज की जय... अशा घोषणानी यावेळी राजकोट परिसर दुमदुमून गेला.
या गडकिल्ले माती कलश यात्रेचा शुभारंभ मालवण देऊळवाडा येथे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. ही रॅली देऊळवाडा येथून भरड मार्गे बाजारपेठ येथून मेढा ते राजकोट किल्ल्या पर्यंत काढण्यात आली. या रॅलीत भगवे फेटे बांधून शिवप्रेमी नागरिक व नऊवारी साडी परिधान करून महिला सहभागी झाल्या होत्या. तर नागेश परब यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा व इतरांनी साकारलेल्या अष्टप्रधान मंडळातील वेशभूषा लक्षवेधी ठरल्या.
यानंतर राजकोट किल्ला येथे शिवरायांच्या पुतळा उभारणीचे भूमिपूजन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. पौराहित्य विलास अभ्यंकर यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील ३२ गडकिल्ले व रायगड आणि शिवनेरी किल्ल्यावरील माती पुतळा पायाभरणीच्या चौथऱ्यात ना. चव्हाण यांच्या हस्ते अर्पण करण्यात आली. यावेळी माजी खासदार निलेश राणे, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राजन तेली, अतुल काळसेकर, पदवीधर आमदार निरंजन डावखरे, युवराज लखमराजे भोसले, दत्ता सामंत, अशोक सावंत, बाबा मोंडकर, विजय केनवडेकर, सुदेश आचरेकर, दिपक पाटकर, अविनाश सामंत, गणेश कुशे, बाबा परब, पूजा सरकारे, पूजा करलकर, ललित चव्हाण, सौरभ ताम्हणकर, मोहन वराडकर, रविकिरण तोरसकर, उमेश नेरुरकर, तहसीलदार वर्षा झाल्टे, गटविकास अधिकारी आपासाहेब गुजर आदी व इतर उपस्थित होते.
यानंतर आयोजित सभेत पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, देशाच्या सागरी सीमा सुरक्षित रहाव्यात, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले सिंधुदुर्ग सारखे जलदुर्ग उभारून सागरी आरमार उभारले. नौदल दिन कार्यक्रम दरवर्षी दिल्ली व इतर ठिकाणी होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंधुदुर्ग किल्ल्यावर नौदल दिन साजरा करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. कार्यक्रमासाठी नौदल पूर्ण क्षमतेने काम करत आहे. तसेच राजकोट किल्ल्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आपण पालकमंत्री म्हणून मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. शिवपुतळा व राजकोट किल्ल्याची उभारणी हा केवळ कार्यक्रम नसून ती आपली सर्वांची अस्मिता आहे, ती जपायची असून शिवरायांच्या विचारांचा वारसा पुढे नेऊया, असेही रवींद्र चव्हाण म्हणाले.
यावेळी राजकोट बाळगोपाळ मित्रमंडळातर्फे पालकमंत्री चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. तर गड किल्ल्यावर पीएचडी करणाऱ्या सौ. ज्योती तोरसकर यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक बाबा मोंडकर यांनी केले, सूत्रसंचालन विजय केनवडेकर यांनी व आभारप्रदर्शन गणेश कुशे यांनी केले.