
दोडामार्ग : तळकट गावासहित संपूर्ण पंचक्रोशीत बीएसएनएलची रेंज मिळण्यात वारंवार अडथळे येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिओ तसेच अन्य कंपन्यांची रेंज उपलब्ध होण्यासंदर्भात कार्यवाही करण्याची मागणी तळकट सरपंच सुरेंद्र सावंतभोसले तसेच परिसरातील ग्रामस्थांनी खासदार नारायण राणे यांची कणकवली येथील निवासस्थानी भेट घेऊन केली.
दोडामार्ग तालुक्यात सुपारी, नारळ, केळी, भात आदी शेतीबागायतींसाठी समृद्ध म्हणून ओळखणाऱ्या येणाऱ्या तळकट गावासहित संपूर्ण पंचक्रोशीतील गावांना बीएसएनएलची नेटवर्क सुविधा चांगल्या प्रकारे मिळत नाही. ग्रामपंचायत, रेशन दुकान, शाळा, बँक, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच अन्य ठिकाणी ही रेंज नसल्याने अनेकांना अडचणी येत आहेत. अनेक प्रशासकीय कामे अक्षरश खोळंबून राहतात. पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी या संदर्भात वारंवार बीएसएनएलचे लक्ष वेधले आहे. परंतु त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांची तळकट सरपंच सुरेंद्र सावंतभोसले यांनी नुकतीच भेट घेतली व त्यांचे याकडे लक्ष वेधले. त्यांच्यासोबत असलेल्या संतोष नानचे यांनी देखील तळकट पंचक्रोशीमध्ये बीएसएनएल रेंजची सध्याची अवस्था व जिओ किंवा अन्य कंपन्यांची रेंज किती आवश्यक आहे ते स्पष्ट केले. दरम्यान या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्याचे सुतोवाच नारायण राणे यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात समृद्ध शेती बागायतींचा भाग म्हणून सुपरिचित असलेल्या तळकट दशक्रोशीमध्ये केवळ मोबाईल रेंजच नव्हे तर अन्य विकास कामे होण्यासाठी तेथील ग्रामस्थांच्या निवेदनांना आपण प्राधान्य देऊ असेही खासदार राणे म्हणाले. यावेळी माजी समाजकारण सभापती अंकुश जाधव, नगरसेवक संतोष नानचे, फोंडू हडीकर उपस्थित होते.