
कुडाळ : कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघात जनतेने दिलेल्या एकतर्फी कौलाचा स्वीकार करत आमदार निलेश राणे यांनी जनतेचे मनापासून आभार मानले आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विरोधकांवर, विशेषतः उबाठा गटावर जोरदार हल्लाबोल केला, तसेच आगामी काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून भ्रष्टाचारमुक्त कारभार आणि विकासाची ग्वाही दिली.
'जनतेचा कौल कामासाठीच'
आमदार निलेश राणे म्हणाले की, "जनतेने आम्हाला एकतर्फी कौल दिला असून, जे मतदारसंघ आमच्याकडे नव्हते ते आमच्याकडे वळवण्यात आम्हाला यश आले आहे. ही संधी आम्ही वाया जाऊ देणार नाही. कुडाळ आणि मालवण तालुक्यात केवळ आणि केवळ विकासात्मक कामे केली जातील. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्व सदस्यांना न्याय दिला जाईल आणि कुठेही भ्रष्टाचार होणार नाही, याची आम्ही खबरदारी घेऊ."
विरोधकांवर सडकून टीका
विरोधकांचा समाचार घेताना राणे म्हणाले की, "विरोधकांकडे आमच्या विरोधात लढण्यासाठी उमेदवार देखील नव्हते, त्यांनी धरून-पकडून उमेदवार उभे केले. निवडून आलेले उमेदवार हे त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वावर निवडून आले आहेत, पक्षामुळे नाही. मालवणमध्ये तर 'मशाल' या चिन्हावर उबाठा गटाला एकही जिल्हा परिषद जागा जिंकता आली नाही. उमेदवारच नसल्यामुळे त्यांचा सुपडा साफ झाला आहे. केवळ वैयक्तिक टीका करून राजकारण होत नाही, हे विरोधकांनी आता समजून घेतले पाहिजे."
अपक्ष म्हणून निवडून आलेल्या उमेदवारांना सोबत घेणार का, या प्रश्नावर उत्तर देताना राणे यांनी स्पष्ट केले की, "आमचा अजेंडा केवळ विकासाचा आहे. ज्या अपक्षांना आमच्या सोबत यायचे असेल आणि ज्यांचा अजेंडा विकासाचा असेल, त्यांना आम्ही नक्कीच सोबत घेऊन चालू."
यावेळी बोलताना त्यांनी खासदार नारायण राणे यांच्या कार्याचाही उल्लेख केला. "येत्या पाच वर्षात खासदार नारायण राणे यांच्या नावाला कोणताही डाग लागणार नाही, असे काम आम्ही करू. महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी आम्ही वाटेल ते प्रयत्न करू आणि ती एक नंबरला आणूनच दाखवू," असा विश्वास निलेश राणे यांनी व्यक्त केला.










