
वेंगुर्ले : दक्षिण कोकणातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान नराचा नारायण तुळस गावातील श्री जैतीर उत्सव २६ मे रोजी साजरा होत आहे. या उत्सवामध्ये कृषी पूरक साहित्य व जीवनावश्यक वस्तूंचा भरणारा बाजार हे मुख्य आकर्षण असते. मात्र जिल्हा बाहेरील काही व्यावसायिक या उत्सवात परवानगी शिवाय दुकाने थाटून मनमानी करतात. त्यांना आळा घालण्यासाठी यावर्षी दुकान मांडणी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीद्वारे योग्य ते नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. या समितीच्या मान्यतेशिवाय कुणालाही दुकान थाटू देणार नाही असा निर्णय तुळस गावातर्फे घेण्यात आला.
नुकत्याच झालेल्या जैतीर उत्सवाच्या नियोजन सभेत हा निर्णय घेण्यात आला. तालुक्यातील तुळस गावात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुमारे ११ दिवस चालणारा हा उत्सव अत्यंत लोकप्रिय आहे. तुळस गावासह दशक्रोशीतील ग्रामस्थ व चाकरमानी या उत्सवाला हजेरी लावतात. नराचा नारायण म्हणून जैतिर देवस्थान लोकप्रिय आहे. त्याचा महिमाही अगाध आहे. नवस बोलणे आणि नवस फेडण्यासाठी अनेक भाविक या उत्सवामध्ये सहभागी होतात. जैतीर उत्सव ते कवळास उत्सवापर्यंत ११ दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पाडले जातात. मिरगा पूर्वी होणारा उत्सव असल्याने या उत्सवाला कृषी पूरक साहित्य व जीवनावश्यक वस्तू मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध असतात. गोवा, बेळगाव, कोल्हापूर, मुंबई येथील अनेक विक्रेते या उत्सवात आपली दुकाने थाटून चांगला व्यवसाय करतात. मात्र गेल्या काही वर्षापासून बाहेरून येणारे विक्रेते मनमानीपणे दुकाने थाटूनअनेकांना त्रास देतात. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी यावर्षी दुकान मांडणी समिती गठीत करण्यात आली आहे. माजी सरपंच आप्पा परब आणि जयवंत तुळसकर हे या समितीचे नेतृत्व करणार आहेत.
दुकान मांडणी समितीकडे नोंदणी केल्याशिवाय कोणाही व्यापाऱ्याला अथवा विक्रेत्याला दुकान मांडण्यात देऊ नये अशा प्रकारचा ठोस निर्णय या नियोजन सभेत घेण्यात आला. उत्सवात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्यात आली. जत्रोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात वाहने सुद्धा येतात त्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रकार ठीकठिकाणी होतात त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वेंगुर्ले पोलिसांच्या सहकार्याने स्वतंत्र नियोजन करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. गावातील स्वयंसेवकांच्या टीमद्वारे संपूर्ण उत्सवावर नजर ठेवण्यात येणार असून अनुचित प्रकार करणाऱ्यांवर वेळीच कारवाई करण्याचेही सभेत ठरवण्यात आले.