आता शिंदे गट नको, शिवसेना म्हणा !

ठाणे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून सचिव संजय मोरे यांचे फर्मान
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: February 21, 2023 19:15 PM
views 239  views

ठाणे : निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि चिन्हाचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता शिंदे गट नको तर शिवसेना म्हणा असे फर्मान ठाणे येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून शिवसेना सचिव संजय मोरे यांनी काढले आहेत.


 एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भूकंपा नंतर राज्यातील शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले. दोन्ही गटाकडून शिवसेना आपलीच असल्याचे सांगितले जात होते. त्या नंतर हा वाद निवडणूक आयोगाकडे गेला. निवडणूक आयोगाने यासंदर्भात दोघांनाही कागदपत्रे सादर करण्यास सांगितले. निर्णय लागेपर्यंत निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवले होते. तसेच दोन्ही गटांना स्वतंत्र नाव आणि चिन्ह दिले होते. त्यानुसार शिंदे गटाने बाळासाहेबांची शिवसेना तर ठाकरे गटाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाने ओळखले जात होते. ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह मिळाले होते.


त्यानंतर निवडणूक आयोगाकडे शिवसेना कुणाची यावर सुनावण्या सुरु झाल्या. दोन्ही बाजूने दावे प्रतिदावे करण्यात येत होते. अखेर दोन दिवसांपूर्वी आयोगाने आयोगाने याचा निकाल जाहीर केला. अन् शिवसेना ही शिंदेंचीच असल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार शिवसेना नाव आणि चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला. या निर्णयानंतर शिंदे गटाकडून विधिमंडळ आणि लोकसभेमधील शिवसेना पक्ष कार्यालये ताब्यात घेण्यास सुरुवात केली. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतरही वारंवार शिंदे गट असा उल्लेख होत होता. त्या पार्श्वभूमीवर ठाणे येथील आनंदआश्रम येथील मध्यवर्ती कार्यालयाकडून सचिव संजय मोरे यांनी आता शिंदे गट नाही, तर "शिवसेना" म्हणा असे फर्मान काढले आहेत.