
रत्नागिरी : जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक म्हणून नितीन बगाटे लवकरच पदभार स्वीकारणार आहेत. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची मुंबई येथे अप्पर पोलीस आयुक्त म्हणून बढती मिळाली असल्याने त्यांच्या जागी नितीन बगाटे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
सिंधुदुर्गचे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. रत्नागिरी येथे बदली होण्यापूर्वी ते पोलिस उप आयुक्त म्हणून छत्रपती संभाजी नगर शहर येथे कार्यरत होते.
नितीन बगाटे हे मूळचे हिंगोली जिल्ह्यातील निशाणा येथील रहिवासी आहेत. त्यांनी सुरुवातीला शिक्षक म्हणून काम केले होते.आयआयटीतून शिक्षण घेतल्यानंतर काही वर्षे ते पुण्यात एका खासगी कंपनीत नोकरीला होते. त्यानंतर ते आयपीएस अधिकारी बनले. परभणी येथे २०१८ ते २०२० याकाळात ते प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी तथा सहायक पोलीस अधीक्षकपदी कार्यरत होते. नितीन बगाटे यांची दबंग अधिकारी म्हणून ख्याती आहे. त्यांनी परभणी, चंद्रपूर, सिंधुदुर्ग येथे काम केले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बगाटे यांच्या नियुक्तीमुळे नागरिकांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे. त्यांच्या अनुभवाचा उपयोग अवैध गतिविधींवर नियंत्रण ठेवण्यासाठी होईल, अशी अपेक्षा आहे. रत्नागिरीतील अंमली पदार्थांचा व्यापार नष्ट करण्याचे मोठे आव्हान बगाटे यांच्यासमोर असणार आहे.