
सावंतवाडी : उद्या जाहीर होणाऱ्या निकालात विजय हा महायुतीचाच होईल, सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी औषधाला देखील शिल्लक राहणार नाही असा विश्वास मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. तसेच प्रदेश पातळीवरील निर्णयानुसार निवडणूका लढवल्या, वैयक्तिक नाहीत. निवडणूका संपल्या २१ तारीखला एकत्र गुलाल उधळू, त्याचीही मजा घ्या, असही विधान त्यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, कॉग्रेस तुम्हाला दिसले का कुठे ? असा सवाल करत विरोधकांना टोला हाणला. तर, आज आम्ही एकत्र दिसलो ना ? दीपक केसरकर आणि मी एकाच जीपमधून आलो. आम्ही प्रगल्भ लोक आहोत. सिंधुदुर्गच्या विकासासाठी महायुती एकत्र आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील निर्णय हा वरिष्ठ पातळीवरून होत असतो. या निवडणुकांमध्ये जरी स्थानिक पातळीवर आम्ही एकमेकांसमोर लढत असलो तरी या लढती मैत्रीपूर्ण असतात. त्यामुळे जेव्हा जिल्ह्याच्या विकासाचा विषय असतो त्यावेळी आम्ही एकाच व्यासपीठावर असतो. शेवटी महायुती म्हणून आम्ही एकच असून कोकणचा विकास हेच आमचे ध्येय आहे असं मत व्यक्त केले. यावेळी माजी मंत्री आमदार दीपक केसरकर, उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, पारपोली सरपंच कृष्णा नाईक, जिल्हा बँक संचालक महेश सारंग, माजी नगरसेवक उदय नाईक, माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे, सहाय्यक वनसंरक्षक सुनील लाड, वैभव बोराटे, उपसरपंच संदेश गुरव, वनक्षेत्रपाल प्रमिला शिंदे, चौकुळ सरपंच गुलाबराव गावडे यांच्यासह वन विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.










