ठाकरेंवर टीका करण्यापलीकडे नितेश राणेंकडे कोणतेही व्हिजन नाही : सतीश सावंत

Edited by: उमेश बुचडे
Published on: November 22, 2023 14:36 PM
views 303  views

कणकवली : भाजपाचे आ.नितेश राणे हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,आदित्य ठाकरे आणि खा.संजय राऊत यांच्यावर टीका करण्यापलीकडे कोणतीही व्हिजन नाही.नितेश राणेंनी भाजपा प्रवक्ते म्हणून कितीवेळा जिल्ह्याचे प्रश्न मांडले.एकदा तरी जिल्ह्यातील शेतकरी किंवा अन्य कामासंदर्भात आवाज माध्यमांमधून उठवला का? असा आरोप शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी केला तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे खळा बैठकांचा माध्यमातून शिवसैनिक आणि जनतेशी थेट  संवाद साधणार आहेत,त्यासाठी कणकवली विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहनही त्यांनी केले.

कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,तालुकाप्रमुख शैलेश भोगले, शहर प्रमुख प्रमोद मसुरकर,महेश कोदे , विलास गुडेकर आदी उपस्थित होते.


कणकवलीत जल्लोषी स्वागत


शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंचे उद्या २३ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत.कणकवलीत खळा बैठक आमच्या घरी आयोजित करण्यात आली आहे. त्याचा दौरा हा कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढविण्यासाठी आहे. कणकवली पटवर्धन चौक येथे जोरदार स्वागत केले जाईल. त्यानंतर माझ्या घरी खळा बैठकीच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला जाणार आहे, असे सतीश सावंत यांनी सांगितले.

शेतकरी फळ पीक विमा संदर्भात फळ पीक विम्यासाठी शासनाने रिलायन्स कंपनी दिली आहे. त्या कंपनी कडे प्रशासकीय वेदर डाटा उपलब्ध नाही. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री उदय सामंत आणि खा.विनायक राऊत, आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून ३८ हवामान केंद्र मंजूर केली होती. त्यापैकी १८ केंद्रावर अद्यापही यंत्रणा नाही.आता नव्याने विमा काढण्यासाठी त्या विमा कंपनीचे पोर्टल उघडलेले नाही. अनेक शेतकऱ्यांना अद्याप पैसे आले नाहीत.सत्तेतील नेते सांगताहेत,त्या १८ केंद्रांवर शेतकऱ्यांना पैसे मिळणार ,पण पैसे अजूनही आले नाही. त्या रिलायन्स कंपनी चे राज्याचे प्रमुख प्रमोद पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. मात्र,त्यांनी एक आठवडा जाणार लागणार असल्याचे सांगितले.सत्ताधारी भाजपाच्या नेत्यांनी जनतेची दिशाभूल करु नये, शेतकऱ्यांसाठी कोण काय करतो हे शेतकऱ्यांना सांगण्याची गरज नाही. खा.राऊत यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय येथे सर्व विमा कंपनीचे अधिकारी यांना बोलावून ३० जून ला विमा जाहीर करण्याची मागणी करणार आहोत.तसेच आता विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांना विमा काढण्यासाठी मुदत वाढ मिळायला हवी, अशी मागणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या कडे करणार आहोत,असेही सतीश सावंत यांनी सांगितले.


आदित्य ठाकरे यांच्या दैऱ्यात कणकवली विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे.शिवसेना पदाधिकारी आणि युवा सेना पदाधिकारी कणकवली पटवर्धन चौक येथे जोरदार स्वागत होईल,युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन सुशांत नाईक यांनी केले.