नितेश राणेंकडे विकासाचं व्हिजन, मंत्रिपद मिळावं

वैभव इनामदार यांची मागणी
Edited by:
Published on: December 14, 2024 16:43 PM
views 204  views

दोडामार्ग :  भाजपा युवा नेतृत्व तथा कणकवली मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्हा विकासाचे व्हिजन आहे. त्यामुळे त्यांना मंत्रीपद मिळणे हे जिल्ह्यासह दोडामार्ग तालुक्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे, असे मत दोडामार्ग तालुका हेल्पलाईन ग्रुप अध्यक्ष वैभव इनामदार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे व्यक्त केले आहे.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे, दोडामार्ग तालुक्याची निर्मिती खासदार नारायण राणे यांनी केली. त्यानंतर आडाळी एमआयडीसी निर्माण केली. मात्र या तालुक्यावर स्थानिक नेतृत्वाकडून वारंवार दुर्लक्ष होत आले. कणकवली मतदारसंघाचे आम. नितेश राणे यांना मंत्री पद मिळाले तर तालुक्यातील तिलारी खोरे डेव्हलपमेंट, पर्यटन मधून रोजगार, एमआयडीसी मधून रोजगार निर्माण होण्यास चालना मिळेल. तसेच तालुक्यातील गोर गरीब जनतेचे आरोग्य सुविधांच्या अभावामुळे होणारी हेळसांड थांबेल. ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर आणि सुविधा यांची उपलब्धता होण्यासाठी चालना मिळेल.

जिल्ह्यासह दोडामार्ग तालुका विकासमय, आरोग्य सुविधा सुदृढ होण्यासाठी आम. नितेश राणे यांना मंत्रीपद मिळणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने लागणारा पाठपुरावा करण्यासाठी दोडामार्ग तालुका हेल्पलाईन ग्रुप सदैव अग्रेसर असेल, असे वैभव इनामदार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्ट केले.