संजय राऊत, आदित्य ठाकरेंच पोलीस संरक्षण काढा !

निलेश राणेंची गृहमंत्री फडणवीसांकडे मागणी
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: March 03, 2023 17:46 PM
views 398  views

मुंबई : खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे यांच्या जीवाला कसलाही धोका नाही. त्यांना कुठल्याही गँगस्टर किंवा दहशतवाद्याची सुद्धा धमकी नाही.  या दोघांनीही आपल्याला संरक्षण हवे अशी मागणी केली नाही. त्यामुळे त्यांचे पोलीस संरक्षण काढण्यात यावे अशी मागणी भाजपा प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 


भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, संजय राऊत हे राज्यसभेचे खासदार आणि आदित्य ठाकरे हे विधानसभेचे आमदार म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र सरकारने त्यांना पोलीस संरक्षण दिले आहे. पण माझ्या वाचण्यामध्ये आणि बघण्यामध्ये त्यांना पोलीस संरक्षण देण्याची काहीच गरज वाटत नाही. खासदार संजय राऊत हे स्वतःहून म्हणाले आहेत त्यांना पोलीस संरक्षणाची गरज नाही. आणि आदित्य ठाकरे हे फक्त साधे आमदार आहेत. त्यांना कुठलीही धमकी आलेली नाही किंवा त्यानी स्वतः तक्रार नोंदविलेली नाही. त्यांना कोणत्याही दहशतवाद्याची किंवा गॅगस्टर ची धमकी नाही किंवा त्यांनी असा कोणताही प्रश्न उचललेला नाही जेणेकरून कुठला वर्ग त्यांना मारण्याचा प्रयत्न करेल.


जसे इतर आमदार, खासदार काम करतात तसेच हे त्यांच्या पदावर काम करत आहेत. त्यात वेगळेपण असे काहीच नाही. जर यांना संरक्षण मिळाले आणि यांच्यापेक्षा चांगले काम करणाऱ्यांना संरक्षण मिळाले नाही तर तो त्यांच्यावर अन्याय ठरेल. म्हणून पोलीस डिपार्टमेंटनी सुद्धा यांच्या जीवाला धोका आहे अस कुठे नोंदविलेले नाही किंवा त्याबद्दल चर्चाही नाही. म्हणून माझी विनंती आहे की यांचे पोलीस संरक्षण काढण्यात यावे कारण यांना संरक्षण देणे गरजेचे नाही तेच पोलीस महाराष्ट्राच्या, मुंबईच्या इतर महत्वाच्या विषयांसाठी काम करू शकतात. त्यांना महाराष्ट्राच्या इतर महत्वाच्या कामासाठी आपण कार्यरत करावे, अशी मागणी निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.