मालवण : गेल्या दहा वर्षांच्या काळात नारायण राणे यांना सोडून अनेक जण गेले. मलाही अनेक ऑफर आल्या. मात्र मी कधीही राणेंपासून लांब जाण्याचा निर्णय घेतला नाही. सगळे गेले तरी मी राणेंसोबतच राहणार असल्याचे निश्चीत केले आहे. राणेंसोबत असल्याने समाजातील अनेकांच्या सुखदुःखात सहभागी होता आले, अनेक राजकीय पदे भुषविता आली आहेत, त्यांनी आज मानसन्मान मिळवून दिला आहे. यामुळेच माझ्या हातून होत असलेल्या समाजकार्यामुळे आज अनेकजण याठिकाणी उपस्थित राहिले आहेत. या सर्वांच्या साक्षीने मी निलेश राणे यांना ५० हजारांचे मताधिक्य देणार असा निर्धार शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी केला.
मालवण शिवसेना नवनिर्वाचित पदाधिकारी सत्कार आणि शिवसेना मेळावा जानकी मंगल कार्यालय येथे पार पडला. त्यावेळी दत्ता सामंत बोलत होते. आज निलेश राणे यांनाही धनुष्यबाण निशाणीवर निवडणूक लढविण्याची संधी मिळाली असल्याने त्यांचा विजय हा १०१ टक्के निश्चित झाला आहे. निलेश राणे हे तीन वर्षांपूर्वी माझ्या घरी आले होते आणि त्यांनी मला कुडाळ-मालवण मतदार संघातून लढण्यासाठी आपण सर्व सहकार्य करण्याचा शब्द दिला होता. मात्र आपण त्यांना नारायण राणे यांच्या पराभवाची परतफेड करण्यासाठी वैभव नाईक यांचा पराभव करण्यासाठी राणे कुटुंबातीलच व्यक्ती हवी आहे असे सांगत तुम्हीच तयारी करा, मी तुम्ही ज्याठिकाणी असाल त्याठिकाणी तुमच्या सोबत असल्याचा शब्द दिला होता. त्यांनतर घुमडाई मंदिराच्या कार्यक्रमातही मी मंदिरामध्ये निलेश राणे यांना आमदार करण्याचा शब्द दिला आहे, आईच्या मंदिरातील शब्द पूर्ण करणे माझी जबाबदारी आहे आणि माझ्या समस्त कार्यकर्त्यांच्या जोरावरच मी शब्द पूर्ण करण्यासाठी पूर्ण तयारीनिशी उतरणार आहे. यामुळे निलेश राणे शिवसेनेत गेल्यानंतर मी नारायण राणे यांचा आशिर्वाद घेऊन शिवसेनेत दाखल झालो आहे आणि आता कुडाळ-मालवण मतदार संघ शिंदे शिवसेनेचा बालेकिल्ला बनविण्यासाठी सज्ज झालो आहे असे श्री. सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.
नारायण राणे यांच्या कारकिर्दीत झालेल्या विकासकामांच्या पुढे गेल्या दहा वर्षात दहा टक्केही कामे झाली नाहीत. यामुळे गावागावात निधीची समस्या निर्माण होवून जनता विकासाच्या प्रतिक्षेत राहिली आहे. यामुळे आपल्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुडाळ-मालवण मतदार संघासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा शब्द दिला आहे. यामुळे गेल्या दहा वर्षात लोकांना होत असलेला त्रास भविष्यातील सहा महिन्यात दूर केला जाईल. गावागावातील रखडलेली विकासकामे पूर्ण करण्याची क्षमता निलेश राणे यांच्यात असून त्यांच्यावतीने आम्ही शब्द देत आहोत. विरोधकांकडून खोटा प्रचार करण्यात येईल पण आम्ही त्यापुढे जावून मताधिक्य कसे मिळणार याकडे लक्ष देणार आहोत. कार्यकर्त्यांनी मताधिक्य मिळवून देण्यासाठी काम करावे. काम करणाऱ्या व्यक्तीचा संघटनेत सन्मान केला जाणार आहे. काम करणाऱ्या व्यक्तीच्या घरी जावून त्यांना पदे दिली जातील, असेही श्री. सामंत यांनी यावेळी सांगितले.