निलेश राणेंनी दिला धीर ; चिंदरातील शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिला पॉवर टिलर

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 12, 2023 19:29 PM
views 167  views

मालवण : ऐन शेती हंगामात चिंदर गावात शेतकऱ्यांची गुरे दगवाल्याने शेतकरी संकटात होते. मात्र, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. त्यांच्या शेतीचे नुकसान होऊ देणार नाही. त्यासाठी पॉवर टिलर उपलब्ध करून देण्यात येईल असा शब्द माजी खासदार निलेश राणे यांनी दिला होता. काही तासातच माजी खासदार निलेश राणे यांनी चिंदर गावासाठी पॉवर टिलर उपलब्ध करून दिला. भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत यांनी हा पॉवर टिलर चिंदर ग्रामपंचायत प्रभारी सरपंच दीपक सुर्वे यांच्याकडे स्वाधीन केला. 


मालवण तालुक्यातील चिंदर गावात गेले तीन दिवस गुरे दगावण्याचे सत्र सुरु आहे. पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लसीकरण केल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे. आतापर्यंत 38 शेतकऱ्यांची 46 गुरे दगावली आहेत. ऐन शेती हंगामात गुरे दगावल्याने शेतकरी संकटात सापडले होते. शेतकऱ्यांवर ओढवलेल्या या संकटानंतर भाजपने त्यांना आर्थिक मदत करत धीर दिला. पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांनी दिलेली आर्थिक मदत भाजपा पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सुपूर्द केली. तर शेतकऱ्यांची शेती अर्धवट राहून नुकसान होऊ नये, यासाठी निलेश राणे यांनी पॉवर टिलर उपलब्ध करून देण्याचा शब्द दिला होता. काही तासातच निलेश राणे यांनी आपला शब्द पुरा करत पॉवर टिलर उपलब्ध करून दिला. आज भाजपा जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब यांनी हा टिलर चिंदर ग्रामपंचायत प्रभारी सरपंच दीपक सुर्वे यांच्या स्वाधीन केला. यावेळी संतोष गावकर, गावकर गावकर, यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.


दरम्यान, आज मुंबई विभागाचे प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. प्रशांत कांबळे हे आज जिल्ह्यात दाखल झाले. त्यांनी चिंदर गावात जाऊन घटनेची माहिती घेतली. तसेच एकूणच परिस्थितीचा आढावा घेतला.