हिंमत हारू नका, यश तुमचंच : निलेश पारकर

Edited by: विनायक गांवस
Published on: February 17, 2024 10:24 AM
views 120  views

सावंतवाडी : जीवनात आपल्याला यशप्राप्ती करायवयाची असेल तर कोणत्याही परिस्थितीत हिंमत हारू नये, आपले सातत्य हे आपल्याला यशोशिखरावर नेत असते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे  आमच्या शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे कार्यकर्ते सहदेव जाधव हे आहेत. अनेकदा त्यांना मेहनत करूनही राज्यस्तरावर यश मिळत नव्हते. मात्र त्यांनी आपल्या कामात सातत्य, कठोर मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्न ठेवले आणि यंदाच्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात त्यांनी घवघवीत यश संपादन केले. त्यांचा आदर्श इतरांनाही घ्यावा असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हा संघटक निलेश पारकर यांनी केले. 

सावंतवाडी येथे नुकतेच ५१ वे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन पार पडले. यात विज्ञान प्रतिकृती स्पर्धेमध्ये नाथ पै ज्ञान प्रबोधिनी या प्रशालेचे प्रयोगशाळा परिचर  सहदेव जाधव यांच्या 'प्रयोगशाळा माझ्या हातात.!' या विज्ञान प्रतिकृतीला राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळाला. याबद्दल त्यांचा सत्कार समारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  मुख्याध्यापक लक्ष्मण नारकर यांनी केले. त्यानंतर सहदेव जाधव यांचा सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हा संघटक निलेश पारकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन, सहृदय सत्कार करण्यात आला.

दरम्यान, श्री. पारकर म्हणाले सहदेव जाधव हे आमच्या संघटनेचे सच्चे कार्यकर्ते असून, गेली अनेक वर्षे ते तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर विज्ञान प्रतिकृतीचे सादरीकरण करीत आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण कामगिरीतूनच त्यांना ही यशप्राप्ती झालेली आहे. त्यांच्या या उत्तुंग यशामुळे प्रशाला, कणकवली तालुका व जिल्हयाचे नांव राज्यस्तरावर अधोरेखित झाले आहे, मला माझ्या या सच्च्या कार्यकत्याचा सार्थ अभिमान वाटतो, अशा शब्दात निलेश पारकर यांनी गौरवोद्‌गार काढले. याप्रसंगी प्रशालेचे सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी सहदेव जाधव यांनी आपला सत्कार केलेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार सहाय्यक शिक्षक श्री. कदम यांनी मानले. दरम्यान सहदेव जाधव यांच्या या सुयशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल राणे, जिल्हा सचिव तथा कोल्हापूर विभागीय कार्यवाह गजानन नानचे  तसेच सर्व जिल्हा पदाधिकारी आणि महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अनिल माने, राज्य सहकार्यवाह  शिवाजी खांडेकर व राज्य पदाधिकाऱ्यांनीही विशेष अभिनंदन केले आहे.