क्रशर विरोधात निगुडे सरपंचांचं उपोषण..!

Edited by: विनायक गांवस
Published on: August 25, 2024 14:50 PM
views 191  views

सावंतवाडी : निगुडे परिसरातील क्वॉरी व क्रशरबाबत निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर यांनी प्रजासत्ताक दिनी उपोषण छेडले. त्यावेळी निगुडकर यांना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे सोमवार २६ ऑगस्टपासून ग्रामस्थांसह पुन्हा बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा सरपंच लक्ष्मण निगुडकर यांनी दिला आहे.

निगुडे गावच्या सिमेलगत असलेल्या क्वॉरी व क्रशरच्या  ब्लास्टिंग मुळे गावातील १५६ घरांना तडे जाऊन नुकसान झाले आहे. गावातून होणाऱ्या भरधाव ओव्हर लोड खनिज वाहतूकिमुळे अनेक समस्या निर्माण झाले आहेत. तसेच रात्री अपरात्री होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे नुकसानीसह जिवितास धोका निर्माण झाला आहे. याबाबत महसूल प्रशासनाचे अनेक वेळा लक्षवेधुनही दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे घरांच्या नुकसान भरपाईसह गावातील ओव्हरलोड वाहतूक आणि अवेळी होणारे ब्लास्टिंग बंद करण्याच्या मागणीसाठी गावातच  बैठक घेण्यासाठी सरपंच लक्ष्मण निगुडकर यांनी प्रजासत्ताक दिनी निगुडे ग्रामपंचायत समोर ग्रामस्थांसह बेमुदत उपोषण पुकारले होते. यावेळी तहसिलदार श्रीधर पाटील यांनी चार दिवसांत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना गावात पाचारण करून प्रत्यक्ष पाहणीसह ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन सर्व प्रश्न व समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन दिले. मात्र २३ ऑगस्टपर्यंत या  मागण्यांची पूर्तता न झाल्यास सोमवारी २६ ऑगस्ट पासून ग्रामस्थांसह पुन्हा बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा  निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर यांनी उपोषण स्थगित केले होते.  मात्र, गेल्या दहा दिवसात महसूल प्रशासनाने कोणतीही कार्यवाही न  केल्यामुळे सरपंच लक्ष्मण निगुडकर यांनी महसूल खात्याला दिलेल्या प्रति इशाऱ्यानुसार आपल्या मागण्यासाठी पुन्हा सोमवारी २६ ऑगस्टपासून बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा दिला आहे.