घाटात नायट्रोजन गॅसचा टँकर कोसळला दरीत

Edited by: ब्युरो
Published on: July 04, 2024 13:34 PM
views 27  views

पोलादपूर: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात उरण ते लोटे नायट्रोजन गॅस वाहतूक करणारा आयशर टेम्पो खचलेल्या रस्त्यावरून चढत असताना वाहनाने गती न घेतल्याने पाठीमागे येऊन खोल दरीत कोसळला. या अपघातात चालक गंभीर झाला असून वायू गळतीमुळे वाहतूक पोलीस सतर्कतेने प्रसंग हाताळत असल्याचे दिसून आले.  

बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास भोगाव गावाच्या हद्दीत हा अपघात झाला.  पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटातून चालक अफिझुर रेहमान (वय ५५ वर्षे) हा आयशर ट्रक (क्रमांक एम एच ०५ ए एम २८१४) यामध्ये नायट्रोजन गॅस भरून उरण ते लोटे येथे घेऊन जात असताना भोगाव गावच्या हद्दीत आले असता येथील खचलेल्या रस्त्यावर चढताना गाडीने गती न घेतल्याने गाडी मागे येऊन थेट संरक्षक कठडे तोडून सुमारे ७० फूट दरीत कोसळला.

 या अपघातात चालक अफिझुर रेहमान हा जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण धडे, उपनिरीक्षक समेळ सुर्वे, पोलीस हवालदार चिकणे, रामागडे, माजलकर यांच्यासह पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव, सहाय्यक फौजदार जयसिंग पवार, पोलीस हवालदार रवींद्र सरणेकर, पोलीस हवालदार घुले, ट्रॅफिक हवालदार धायगुडे,१०८ रुग्णवाहिकेची संपूर्ण टीम, महाड नगर परिषद आणि महाड एमआयडीसी येथील तीन अग्निशामक बंब घटनास्थळी तातडीने पोहोचले. महामार्ग पोलिसांनी दोन्ही बाजूची वाहतूक पुर्ण सतर्कता बाळगत सुरू ठेवली आहे.