
खेड: तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील श्री पुष्कर केमिकल्स अँड फर्टीलायझर्स या कारखान्याच्या युनिट पाचमधून सल्फर डाय ऑक्साईड नामक वायूची गळती होऊन साळकेवाडी व तलारेवाडीमधील ग्रामस्थांना श्वसनाचा त्रास झाला. तसेच परिसरातील झाडेझुडपे, गवत व परसबागेतील भाजीपाला जळून नष्ट झाला. या प्रकारामुळे तलारीवाडी व चाळकेवाडीमधील ग्रामस्थ संतप्त झाले होते. ग्रामस्थांनी कंपनीच्या प्रवेशद्वारावर धडक दिली.
यावेळी लोटे गावचे सरपंच चंद्रकांत चाळके, चाळकेवाडीचे अध्यक्ष रोहित चाळके यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. या ग्रामस्थांनी कारखाना प्रशासनाला जाब विचारला असता व्यवस्थापनाकडून वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे या वायूची गळती झाली असे सांगण्यात आले. पुन्हा अशी दुर्घटना घडू नये यासाठी आम्ही योग्य ती खबरदारी घेऊ, अशी ग्वाही देण्यात आली. मात्र या दोन्ही वाड्यांमधील ग्रामस्थ यावर समाधानी झाले नाही. वारंवार अशा दुर्घटना या कारखान्यात होत असून कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक गौतम माखारिया यांच्याकडे या दुर्घटनांबाबत वारंवार ग्रामस्थांनी तक्रारी करून देखील त्यांनी गांभीर्याने घेतलेले नाही. म्हणून भविष्यात जर काही गंभीर अपघात झाला तर ग्रामस्थ कोणत्याही प्रकारे या कारखाना व्यवस्थापनाला माफ करणार नाही. प्रसंगी कारखाना बंद करावा लागला तरीही चालेल अशी भूमिका संतप्त ग्रामस्थांनी घेतली आहे.