
वेंगुर्ला : तालुक्यातील शिरोडा ग्रामपंचायतमध्ये महाविकास आघाडीने आपला करिश्मा दाखवत सत्ताबदल करून भाजपला धक्का देत सरपंच व ८ सदस्य निवडून आणले. याबद्दल गावच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
येथील माऊली सभागृहात हा सत्कार कार्यक्रम झाला. यावेळी माजी आमदार शंकर कांबळी, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत परब, पं स माजी उपसभापती सिद्धेश उर्फ भाई परब, जिल्हा बँक माजी संचालक राजन गावडे, शिवसेना शहर प्रमुख अजित राऊळ, माजी उपसरपंच प्रवीण धानजी, माजी ग्रामपंचायत सदस्य आजू अमरे, ग्रामस्थ दिगंबर परब, बावी गावडे, संदीप गावडे, युवक काँग्रेस अध्यक्ष जगन्नाथ गावडे, श्री पडवळ, प्रमोद नाईक, अमोल परब यांच्यासहित इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित सरपंच लतिका लक्ष्मण रेडकर, सदस्य चंदन सदानंद हाडकी, अनिश्का आनंद गोडकर, प्रथमेश गणेश परब, राजन यशवंत धानजी, नंदिनी अनिल धानजी, पांडुरंग बाबू नाईक, रश्मी राजन डीचोलकर, शितल शरद नाईक यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच या सर्वांना निवडून आणण्यासाठी मेहनत घेतलेल्या माजी आमदार शंकर कांबळी, सिद्धेश उर्फ भाई परब व संदीप गावडे आणि सहकारी यांचा सुद्धा सत्कार यावेळी करण्यात आला.
शिरोड्यातील जनतेने आपल्यावर विश्वास ठेवून सर्व समाज एकत्र आल्याने हा विजय मिळाला आहे. यामुळे ग्रामपंचायत मध्ये भ्रष्टाचारमुक्त कारभार करणे ही तुमची सर्वांची जबाबदारी आहे. असे माजी आमदार शंकर कांबळी यांनी सांगत पुढील उपसरपंच पदाच्या निवडणुकीत सर्वजण एकत्र राहून आपलाच उपसरपंच विराजमान करू अशी शपथ नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांना दिली.