नवमतदारांनो नाव नोंदणी करा : जिल्हाधिकारी

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 27, 2023 11:09 AM
views 104  views

सिंधुदुर्ग : लोकशाही सक्षमीकरणाची पहिली पायरी मतदार नोंदणी असल्याने पात्र नवमतदारांनी नाव नोंदणी करून आपला मताधिकार बजावावा. निवडणूका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण, शुध्दीकरण अत्यंत महत्वपुर्ण असते. यासाठी मा. भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबवला जातो. दि. २७ ऑक्टोबर, २०२३ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप यादी प्रकाशित करून यंदाच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला, सदर कार्यक्रम २७ ऑक्टोबर ते ०९ डिसेंबर २०२३ या कालावधीत राबवला जाणार आहे. या कालावधीत आक्षेप किंवा हरकती घेता येणार आहेत. अशी माहिती पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी किशोर तावडे यांनी दिली.

प्रारूप मतदार यादीमध्ये आपले नाव आहे की नाही याची मतदारांनी खात्री करणे आवश्यक आहे. कारण, बरेचदा ऐन मतदानाच्या दिवशी आपले नाव मतदार यादीत नाही, अशी तक्रार अनेक मतदारांकडून केली जाते. समाजातील काही वंचित घटकांतील नागरिकांची मतदार यादीत अल्प प्रमाणात नोंद असल्याने त्यांच्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयांमधील राष्ट्रीय सेवा योजना व निवडणूक साक्षरता मंडळ यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. यासाठी विशेष शिबिरे आयोजित केलेली आहेत. दिव्यांगासाठी कार्य करणा-या सामाजिक संस्थांच्या मदतीने दिव्यांग व्यक्तीची मतदार नोंदणी, त्यांची मतदार यादीतील नोंद चिन्हांकित करणे या गोष्टी केल्या जाणार आहेत. असे जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी किशोर तावडे यांनी सांगितले.

ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या सहकार्याने दि. २७ ऑक्टोबर ते दि.१० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत जिल्हयात विशेष ग्रामसभेचे आयोजन केले जाणार आहे. या काळात विशेष ग्रामसभांमध्ये मतदार यादीचे वाचन केले जाईल. त्यांतर्गत नव्याने नाव नोंदणीस पात्र नागरिक, लग्न होऊन गावात आलेल्या स्त्रीया, गावात कायमस्वरूपी नव्याने वास्तव्यास आलेले नागरिक यांची नाव नोंदणी केली जाईल. तसेच दुबार नावे, मृत व्यक्ती, गावातून कायमस्वरूपी स्थलांतरीत झालेल्या व्यक्ती, लग्न होऊन अन्य गावात गेलेल्या स्त्रीया यांच्या नावांची मतदार यादीतून वगळली जाणार आहेत.

दि. ०५ जानेवारी, २०२३ च्या अंतिम मतदार यादीमध्ये एकूण मतदार संख्या ६,७२,७७६ इतकी होती. निरंतर अद्ययावतीकरण प्रक्रियेत मतदार नोंदणी, नाव वगळणी या बाबी सुरूच होत्या. आज रोजी एकूण मतदार संख्या ६,६९,५९८ इतकी असून त्यामध्ये पुरुष मतदार ३,३३,९८७ व स्त्री मतदार ३,३५,६११ व स्त्री-पुरुष गुणोत्तर प्रमाण १००५ इतका आहे.

सिंधुदुर्ग जिल्हयाच्या लोकसंख्येत १८-१९ वयोगटाची टक्केवारी ३.४४ इतकी आहे. पण ऑक्टोबरच्या मतदार यादीत या वयोगटाची टक्केवारी १.०५ एवढी आहे. भारत हा तरूणांचा देश आहे असं आपण एकीकडे म्हणतो, पण मतदार यादीतली त्यांची आकडेवारी निराशाजनक आहे. त्यामुळे १८ ते १९ युवा मतदारांची आपली मतदान नोंदणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे.