कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवर सिंधुदुर्गवासियाची मात !

जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील यांची माहिती
Edited by: भरत केसरकर
Published on: December 21, 2023 10:31 AM
views 46  views

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका पुरुषाला कोरोना व्हेरिएंट (JN.1)ची लागण झालेली होती. मात्र, आता तो रुग्ण पूर्णपणे बरा होऊन घरी आहे अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा शल्यचिकित्सक  श्रीपाद पाटील यांनी दिली आहे. हा रुग्ण आपल्या रूटीन चेकअपसाठी गोव्यात गेला असता त्याला लागण असल्याचं निदर्शनास आलं. दरम्यान त्याची प्रकृती आता चांगली असून तो घरी परतला असल्याची माहिती श्री.पाटील यांनी दिली आहे. मात्र त्यांनी याबाबत कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिला आहे. या घटनेने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेत एकच खळबळ माजली आहे. याबाबत कमालीची गुप्तता आरोग्य विभागाकडून बाळगण्यात येत आहे. जोपर्यंत याचे डिटेल्स येत नाहीत तोपर्यंत आपण अधिकृत माहिती देवू शकत नाही अशी प्रतिकीया डाॅ श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.
    
राज्यात JN.1 या व्हेरियंटचा रूग्ण आढळला आहे. सिंधुदुर्ग  येथील ४१  वर्षीय  पुरूष नव्या व्हेरिएंटने संक्रमित आढळला होता. यामुळे सर्व जिल्ह्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात येत असून आवश्यकतेनुसार गरजेच्या ठिकाणी मास्क घालणे, वारंवार हात धुणे तसेच कोविड टाळण्यासाठी योग्य काळजी घेणे गरजेचे असल्याचं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलंय. राज्यात नव्या व्हेरियंटच्या एंट्रीने सर्व जिल्हयांना दक्षता घेण्याचे कळविले असून रुग्णांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्वेक्षणांमध्ये आढळून आलेल्या  I.L.I आणि  SARI रुग्णांचे कोविड चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबरोबर सर्व जिल्ह्यांना कोविड चाचण्या वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.