
सावंतवाडी : सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या न्यू लाईफ मेडिकल अँड एज्युकेशन ट्रस्टने 'जिव्हाळा सेवाश्रम'ला इन्व्हर्टर आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची भेट देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. सुमारे ५० हजार किमतीच्या वस्तू सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत.
मागील दोन महिन्यांपूर्वी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्यावतीने जिव्हाळा सेवाश्रमास रोख रक्कम आणि जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या होत्या. त्यावेळी आश्रमाचे अध्यक्ष श्री. बिर्जे यांनी संस्थेजवळ आश्रमातील लोकांना अंधारात राहावे लागते, अशी व्यथा मांडली होती. त्यावर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सौ. रूपा गौंडर (मुद्राळे) यांनी इन्व्हर्टर मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते.
या आश्वासनानंतर, सौ. गौंडर (मुद्राळे) यांनी न्यू लाईफ मेडिकल अँड एज्युकेशन ट्रस्ट, ख्रिश्चनवाडी, माजगाव, गरड, सावंतवाडी यांच्याशी संपर्क साधून मदत मागितली. ट्रस्टने त्वरित मदतीस होकार दिला. त्यानुसार, आज रोजी जिव्हाळा सेवाश्रमास इन्व्हर्टर आणि जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या. या मदतीबद्दल जिव्हाळा सेवाश्रमाचे अध्यक्ष श्री. बिर्जे यांनी न्यू लाईफ मेडिकल अँड एज्युकेशन ट्रस्ट आणि सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे आभार मानले.याप्रसंगी न्यू लाईफ मेडिकल अँड एज्युकेशन ट्रस्टचे अधिकारी ऑगस्टीन फर्नांडिस, इशेद परेरा, मायकल फर्नांडिस, ऋषिकेश नाईक तसेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या रूपा मुद्राळे, शरदीनी बागवे, रवी जाधव उपस्थित होते.