मालवण एसटी स्टँडच्या नवीन इमारतीच्या कामाची आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी

डिसेंबर पर्यंत पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्याच्या एसटी विभाग नियंत्रकांना दिल्या सूचना
Edited by:
Published on: August 17, 2023 17:49 PM
views 223  views

मालवण : आमदार वैभव नाईक यांनी आज मालवण एसटी स्टँडच्या नवीन इमारतीची पाहणी करत पूर्ण झालेल्या व  अपूर्ण असलेल्या कामाची माहिती घेतली. आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने मालवण एसटी बस स्थानकासाठी अडीच कोटी रुपये निधी मंजूर केला होता. त्यानुसार एसटी स्टँड इमारतीच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे. डिसेंबर पर्यंत हे काम पूर्ण करण्याच्या सूचना आ. वैभव नाईक यांनी एसटीचे विभाग नियंत्रक अभिजीत पाटील यांना दिल्या आहेत.


मालवण एसटी स्टँड मध्ये सिनेमागृह प्रस्तावित आहे. दुसऱ्या टप्प्यात सिनेमागृहाचे काम मंजूर करून लवकरात लवकर त्याची टेंडर  प्रक्रिया केली जाईल असे आ.वैभव नाईक यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर  लोकांच्या मागणीनुसार ज्याठिकणी नवीन एसटी फेऱ्या सुरू करणे आवश्यक आहे, तसेच बंद असलेल्या एसटी फेऱ्या पुन्हा  सुरू करणे आवश्यक आहे त्याठिकाणी एसटी फेऱ्या सुरू कराव्यात अशाही सुचना आ.वैभव नाईक यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी एसटी स्टँड मधील विद्यार्थी व नागरिकांशी आ.वैभव नाईक यांनी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याची ग्वाही दिली.

यावेळी एसटीचे विभाग नियंत्रक अभिजीत पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे  मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी बांधकाम सभापती मंदार केणी, शहरप्रमुख बाबी जोगी, उपशहरप्रमुख संन्मेष परब, एसटीचे विभागीय अभियंता अक्षय केकरे, आगार व्यवस्थापक राहुल कुंभार, एसटी स्थानक प्रमुख सतीश वाळके आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.