काकाच्या मृत्यूस कारणीभूत पुतण्याला 10 वर्षांचा कारावास !

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: December 08, 2023 15:47 PM
views 657  views

सिंधुदुर्ग : जमीन विक्री करून हिस्स्याचे पैसे न दिल्याने रागाच्या भरात काकाच्या डोक्यावर व शरीरावर फावड्याने हल्ला करत प्रभाकर नाईक यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी आरोपी शैलेश वसंत नाईक याला दोषी ठरवत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस जे भरूका यांनी दहा वर्षे सश्रम कारावास व 1 हजार रुपये दंड ठोठेवला आहे.

सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे करमळगाळू येथे 17 ऑक्टोबर 2021 रोजी आरोपी शैलेश वसंत नाईक याने काकाने जमीन विक्री करून आपल्याला हिस्स्याचे पैसे न दिल्याचा राग मनात ठेवून काकावर फावड्याने हल्ला केला होता. यात प्रभाकर नाईक यांना डोक्यावर व शरीरावर गंभीर दुखापत झाली होती. मात्र प्रभाकर नाईक यांचा उपचारादरम्यान सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला होता. यानंतर आरोपी शैलेश वसंत नाईक याच्यावर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी जिल्हा न्यायालयात सुनावणी दरम्यान आठ साक्षीदार तपासण्यात आले व यानंतर आरोपी शैलेश वसंत नाईक याला दोषी ठरवत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस जे भरूका यांनी भादवी कलम 304 (1)  अन्वये 10 वर्षे सश्रम कारावास व 1 हजार रुपये दंड ठोठवला आहे व 1 हजार रुपये दंड न भरल्यास एक महिना सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. याकामी सरकारी वकील गजानन तोडकरी यांनी काम पाहिले.