
सावंतवाडी : गोवा येथून नेपाळला जाणाऱ्या एका खासगी बसमधील प्रवाशाचा आंबोली घाटात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली. बलबहादूर कालीबहादूर खडका (वय ५४, रा. डाडागांव, नेपाळ) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. गोवा येथून नेपाळकडे जात असलेली खाजगी बस मध्यरात्री दीडच्या सुमारास आंबोली घाटात आली असता, प्रवासी बलबहादूर खडका यांना अस्वस्थ वाटू लागले. बसमधील इतर प्रवाशांनी तातडीने आंबोली पोलीस दूरक्षेत्र येथे माहिती दिली. त्यानंतर त्यांना तात्काळ आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश जाधव यांनी तपासणी केली असता खडका यांचा वाटेतच मृत्यू झाल्याचे घोषित केले.