आरोग्य क्षेत्रातील आव्हाने पेलण्यासाठी सज्ज होण्याची गरज : प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर

Edited by: विनायक गावस
Published on: June 30, 2023 11:22 AM
views 68  views

सावंतवाडी : विद्यमान परिस्थितीत आरोग्य क्षेत्रात  प्रशिक्षीत मनुष्यबळाची गरज असून विशेषतः कोवीड महामारीच्या काळात याची जाणीव समाजातील सर्वच घटकांना झाली. यासाठी शासनाने आर्थिक द्रुष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांसाठी सामाजिक संस्था किंवा खासगी आस्थापनेच्या सहकार्याने विविध योजना कार्यान्वित केलेल्या असून त्याचा लाभ अनेक गरजवंताना होत आहे. पंतप्रधानांच्या संकल्पनेतून कौशल्य विकास योजनेला प्रोत्साहन दिलेले असून राष्ट्रीय व्यावसायिक परिषदेने मान्यता दिलेला तीन महिन्याचे रुग्णसेविका प्रशिक्षण सावंतवाडीतील सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ डॉ. राजेश नवांगुळ यांच्या यशराज हाॅस्पिटल मधून देण्यात आले होते. या प्रशिक्षणार्थीना सर्टिफिकेट वितरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्ह्यातील पन्नास मुली या प्रशिक्षणात सहभागी झाल्या होत्या. रुग्णांना प्राथमिक उपचार आणि त्यांची आवश्यक काळजी घेण्याबाबतचे परिपूर्ण प्रशिक्षण देण्यात आले असून त्यानां कोणत्याही खाजगी आस्थापनेत रोजगाराची संधी मिळू शकते. 

   कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात बोलताना डॉ. नवांगुळ यांनी सरकारच्या कौशल्य विकास संकल्पनेचा जिल्ह्यातील 

सामाजिक संस्था व खाजगी व्यवस्थापनाने सक्रिय सहभाग घेऊन प्रचार आणि प्रसार केला पाहिजे असे आवाहन केले. 

    कार्यक्रमाला उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते अॅड नकुल पार्सेकर यांनी आपल्या खासगी वैदयकीय व्यावसाया बरोबरच डॉ राजेश नवांगुळ हे सामाजिक बांधिलकी जोपासून अशा समाजपयोगी उपक्रमाच्या माध्यमातून तरूण मुला मुलींना आरोग्य क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहे हे कौतुकास्पद असून यापूर्वी जन शिक्षण संस्थान , अटल प्रतिष्ठान व यशराज हाॅस्पिटलच्या सयुक्त विद्यमाने शंभरहून जास्त मुलींना सहा महिन्याचे प्रशिक्षण दिलेले होते व या सर्व प्रशिक्षित मुली आज महाराष्ट्रातील विविध खाजगी वा सरकारी आस्थापनेत कार्यरत आहेत. 

यावेळी पन्नास प्रशिक्षणार्थीना प्रांत पानवेकर यांच्या शुभहस्ते सर्टिफिकेटचे वितरण करण्यात आले. प्रशिक्षणार्थीच्या वतीने कुमारी समिक्षा गावडे यांनी आपले अनुभव कथन केले. आभार प्रदर्शन सौ. मनिषा नवांगुळ यांनी केले. यावेळी सौ. तृप्ती पार्सेकर, श्री नाना शेंडगे व प्रशिक्षणार्थी मुलींचे पालक उपस्थित होते.