
वेंगुर्ले : जागृती कला-क्रीडा मंडळाच्या माध्यमातून संजय मालवणकर यांनी उभी केलेली चळवळ त्यांचे हितचिंतक पुढे घेऊन चालले आहेत ही बाब आश्वासक आहे. मुलांमध्ये कला, क्रीडा, सांस्कृतिक संस्कार घडविण्यासाठी अशा प्रकारच्या महोत्सवांची नितांत गरज आहे. हीच गरज ओळखून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या महोत्सवाला सहकार्य केले आहे. याही पुढे अशा प्रकारच्या उपक्रमांना आमचे सहकार्य राहील, असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हा समन्वयक तथा सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य सचिन वालावलकर यांनी वेंगुर्ले येथे केले.
दीपकभाई केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी व शिवसेना वेंगुर्ला पुरस्कृत शाश्वत सेवा बहुउद्देशीय संस्था सिंधुदुर्ग व वेंगुर्ले येथील जागृती कला क्रीडा मंडळ यांनी येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या शाश्वत कला क्रीडा जागृतोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी सचिन वालावलकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अशोक दळवी, जिल्हा संघटक सुनील डुबळे, वेंगुर्ले तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर शहर प्रमुख उमेश येरम, दीपकभाई केसरकर मित्रमंडळाचे गजानन नाटेकर, शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख ऍड. नीता कविटकर, वेंगुर्ले तालुका महिला आघाडी प्रमुख ऍड. श्रद्धा बाविस्कर, वेंगुर्ले तालुका अल्पसंख्यांक महिला आघाडी प्रमुख शबाना शेख, युवासेना वेंगुर्ले शहर प्रमुख संतोष परब, पत्रकार शेखर सामंत, जागृतीचे अध्यक्ष दिलीप मालवणकर, तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष प्रदीप सावंत, शाश्वत सेवा संस्थेचे खजिनदार राजकुमार चव्हाण, श्याम कौलगेकर, मनिष दळवी, कविता राऊळ, मनाली कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
बालवाडीपासून ते दहावीपर्यंचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी आयोजित केलेल्या व विविध प्रकारच्या स्पर्धाचा सामावेश असलेल्या या जागृतोत्सवाचे उदघाट्न संजय मालवणकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीपप्रज्व्लन करून करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत जागृतीचे अध्यक्ष दिलीप मालवणकर, शाश्वत सेवा संस्थेचे सचिव महेंद्र मातोंडकर व पदाधिकाऱ्यांनी केले. उपस्थित मान्यवरांनी संजय मालवणकर यांच्या प्रती आदरांजली व्यक्त करून अनेक आठवणी जिवंत केल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेंद्र मातोंडकर यांनी केले. तर सूत्रसंचालन प्रा. वैभव खानोलकर यांनी केले.