कुडाळ - मालवण मतदारसंघात राष्ट्रवादी उमेदवार देणार

युवा नेते अनंतराज पाटकर यांची माहिती
Edited by:
Published on: November 01, 2025 12:51 PM
views 182  views

कुडाळ : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच मालवण नगरपरिषद निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघातून आपले अधिकृत उमेदवार देणार असल्याची माहिती मिळाली आहे.

या संदर्भात पक्षश्रेष्ठींकडून लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार असून, स्थानिक स्तरावर इच्छुक उमेदवारांनी पक्षाशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते अनंतराज नंदकिशोर पाटकर यांनी केले आहे.

पाटकर म्हणाले की, “स्थानिक स्वराज्य संस्थांमधून पक्षशक्ती वाढविण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना संधी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कटिबद्ध आहे. पक्षाने प्रत्येक गावात, प्रत्येक मतदारसंघात संघटन बळकट करण्याचा निर्धार केला आहे.”

दरम्यान, मालवण नगरपरिषद निवडणुकीत महायुतीकडून अधिकाधिक जागा मागण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, असेही सूत्रांकडून समजते.

यावर प्रतिक्रिया देताना पाटकर यांनी सांगितले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निर्णायक भूमिका बजावेल. जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांची ताकद हेच आमचं मुख्य भांडवल आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विजय मिळवेल, असा विश्वास आहे.