
चिपळूण : कोकणात राष्ट्रवादी काँग्रेसला एकमेव विजय मिळवून देणाऱ्या चिपळूण विधानसभा मतदारसंघात यावेळी राष्ट्रवादी (अजित पवार गट) विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार गट) अशी लढत होईल हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे कोकणातील राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी हा सामना कोण जिंकतयं याकडे तमाम महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पक्षाचे दोन भाग झाल्याने दोन्ही गटांना मित्रपक्षांची गरज लागणार आहे. आता महायुती आणि महाविकास आघाडीतील हे घटकपक्ष काय भूमिका घेणार, यावर चिपळूणचा निकाल ठरणार आहे.
बरीच वर्षे चिपळूण मतदारसंघावर शिवसेना-भाजप युतीचे वर्चस्व होते. मात्र युतीचे वर्चस्व मोडून काढत २०१९ साली राष्ट्रवादीचे शेखर निकम येथे आमदार झाले. त्यांनी अजित पवार यांच्यासोबत राहणे पसंत केल्यामुळे आता त्यांना शिंदे सेना आणि भाजपची साथ आहे.
प्रशांत यादवना उमेदवारी ?
आधी काँग्रेसमध्ये असलेले प्रशांत यादव आता राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्षात गेले आहेत. तेथे त्यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. त्यामुळे या मतदारसंघात आता राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अन्य उमेदवार असले तरी लढत या दोन पक्षात असेल.
मित्र पक्षांची भूमिका
या मतदार संघातील विद्यमान आमदार राष्ट्रवादीचे असल्याने महायुतीकडून पुढील उमेदवार तेच असतील, हे निश्चित आहे, मात्र तरीही महायुतीतील शिंदे सेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष येथे निवडणूक लढवण्याची उत्सुक आहेत. अशी चर्चा सुरु आहे. प्रत्यक्षात उमेदवारी कोणाला मिळणार आणि त्यांचे मित्रपक्ष काय करणार, यावर निकाल ठरू शकतो.
ठाकरे गटातील इच्छूक
गतवेळी शेखर निकम विजयी झाले तेव्हा शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर होती. त्यातही ते महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यामुळे उद्धव ठाकरे सेनेला ही जागा लढवण्याची तीव्र इच्छा आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने, राजेंद् महाडिक या सर्वांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.