दोडामार्गातील शेतकऱ्यांचा लढ्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा

संवेदनशील परिस्थिती देखील सत्ताधारी लोकप्रतिनिधी गप्प : अर्चना घारे
Edited by: विनायक गावस
Published on: August 10, 2023 16:48 PM
views 143  views

सावंतवाडी : दोडामार्ग तालुक्यातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या हत्तींचा कायमचा बंदोबस्त करा ते जमत नसेल तर आम्हाला अधिकार द्या  अशी मागणी घेऊन दोडामार्गातील तब्बल दहा गावच्या ग्रामस्थांनी वनविभागाच्या कार्यालयासमोर मोर्चा काढला. या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी मोर्चेकऱ्यांची भेट  घेत पाठिंबा जाहीर केला.

दोडामार्ग तालुक्यात गेली २२ वर्षे हत्तींचा प्रश्न कायम आहे. त्यांच्या उपद्रवामुळे शेती बागायतींच मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मिळणारी नुकसान भरपाई ही तुटपुजी आहे. तर दुसरीकडे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे आश्वासने नको, हत्तींचा कायमचा बंदोबस्त करा, अन्यथा अधिकार आमच्या ताब्यात द्या, आम्ही एका शब्दानेही कोणाला विचारणार नाही. आमचे संरक्षण आम्ही करू, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही असे सांगून तब्बल पाच तास आंदोलक आपल्या मागण्यावर ठाम आहेत. काही झाले तरी जोपर्यंत आश्वासन मिळणार नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही असा निर्णय घेतला आहे. निश्चितच या भागातील सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी याबाबत चर्चा करून यातून मार्ग काढण्याची गरज आहे. परंतु अतिशय संवेदनशील परिस्थितीमध्ये देखील ते या प्रश्नावर बोलायला तयार नाहीत. अशावेळी शेतकरी बांधवांची अशा प्रकारची संतप्त भावना उमटणे सहाजिक आहे. दोडामार्गमधील माझ्या शेतकरी बांधवांना पूर्णपणे पाठिंबा असून या लढ्यात मी त्यांच्यासोबत आहे अस मत राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केले.


 यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहराध्यक्ष देवेंद्र टेमकर, महिला शहराध्यक्ष अँड सायली दुभाषी, राकेश नेवगी आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.