
सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघावरून महाविकास आघाडीमध्ये एकमत झाले नसून हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाला सुटावा व अर्चना घारे-परब यांना उमेदवारी देण्यात यावी यासाठी खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आग्रह केला आहे.
महाविकास आघाडीमध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ कोणाला सोडावा ?यावरून सध्या संभ्रमावस्था कायम आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच सोडण्यात यावा असा आग्रह धरला आहे. उबाठा शिवसेनेन यावर दावा केला आहे. भाजपमधून नुकत्याच आलेल्या राजन तेली यांना उबाठातून उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशातच सावंतवाडी विधानसभा मतदारसंघावरून मुंबईत मातोश्री व सिल्व्हर ओक यांच्यात जोरदार खलबते सुरू आहेत. अर्चना घारे-परब यांच्यासाठी राष्ट्रवादी आग्रही आहे. महाआघाडीत बंडखोरी होण्याची देखील शक्यता आहे. हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला येतो हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.