
सावर्डे : शारदा देवीचे मंदिर म्हणजे दक्षिणात्य स्थापत्य कलेचा एक उत्तम नमुना आहे या मंदिरात श्री शारदा देवी बरोबरच श्री वरदान देवी श्री मानाई देवी आणि श्री चंडिका देवी यांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येते. नवरात्र काळात या देवींच्या रुप्याच्या मूर्ती बरोबरच गौराई देवीच्या मूर्तीची ही स्थापना करण्यात येते. 3 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी सहा वाजले पासून सदर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहील.अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीच्या रुप्याच्या मूर्तीची व गौराई देवीची प्रतिष्ठापना करून या मूर्तींना वस्त्रालंकारनी सजविले जाते. विजयादशमी पर्यंत नऊ दिवस हा साज भाविकांच्या मनाला एक वेगळाच आनंद देतो.. प्रेक्षणीय विद्युत रोषणाई, विलोभनीय निसर्ग सौंदर्य, फुलांची आरास यामुळे हे मंदिर भाविकांच्या मनाला भुरळ घालते. सकाळी 8 ते संध्याकाळी 11.30 पर्यंत अविरतपणे दर्शन फेरी चालू असते. रात्री नऊ वाजता देवीची महाआरती होते .तसेच 10.30 व 11.30 ला जाखडी नृत्याला सुरुवात होते. परंपरागत वेशभूषेत सादर केलेले हे जाखडी नृत्य म्हणजे लोककलेचा एक वेगळाच अविष्कार असतो. हे सर्व पाहण्यासाठी भाविकांची नऊ दिवस गर्दी उसळते. रात्री साडे अकरानंतर संतती विषयक नवस करणे व ते फेडणे याची मंदिरात रीघ लागलेली असते.रात्री 11.30 नंतर येणाऱ्या भाविकांसाठी मुख दर्शनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे
संततीसाठी पावणारी आणि भक्तांच्या हाकेला धावणारी देवी अशी ख्याती असलेल्या चिपळूण तालुक्यातील तुरंबवची श्री शारदा देवीच्या नवरात्रोत्सव दिनांक 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. श्री शारदा देवीचे महाराष्ट्रातील हे एकमेव मंदिर आहे. आजच्या आधुनिक युगात तरुण पिढीला दांडिया, गरबा अशा नाचांची आवड असताना देखील या उत्सवात गेली शतकापासून सुरू असलेले पारंपारिक जाखडी नृत्य हे भाविकांचे एक मोठेच आकर्षण असते. संतती प्राप्तीसाठी केलेले नवसाला पावणारी देवी असा शारदा देवीचा लौकिक आहे. नवरात्री उत्सव काळात केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यातून तसेच परदेशातूनही हजारो नागरिक या मंदिरात उपस्थिती लावतात.मुंबई गोवा महामार्गावर सावर्डे येथून पश्चिमेकडे साधारणपणे 11 किलोमीटर अंतरावर तुरंबव या निसर्गरम्य गावी शारदा देवीचे मंदिर आहे.
भक्त निवासाची उत्तम सोय
नवरात्र उत्सव काळात बाहेर गावाहून येणाऱ्या सर्व भाविकांची श्री शारदा देवी मंदिर परिसरात भक्तनिवासाची उत्तम सोय असून न्यासाचे सर्व विश्वस्त मंडळ व पदाधिकारी या सर्व भाविकांची सेवा करण्यासाठी तत्पर असतात. एसटी महामंडळाचे उत्तम सहकार्य एसटी महामंडळाच्या वतीने चिपळूण तुरंबव व सावर्डे तुरंबव या बस फेऱ्या चालू असतात रेल्वेने येणारे भाविकही या बससेवेचा आधार घेऊ शकतात. त्याचबरोबर मंदिर परिसरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस विभागाकडून पुरेपूर बंदोबस्त ठेवला जातो व मंदिर परिसरात पार्किंगची भव्य व्यवस्था केली जाते.सरकारी यंत्रणे कडून या काळात मोठ्या प्रमाणावर सहकार्य असते.
नऊ दिवसाच्या दिमागदार कार्यक्रमानंतर विजयादशमी दिवशी संध्याकाळी मंदिरासमोरील प्रांगणात गावकऱ्यांच्या उपस्थितीत सामुदायिक सोने लुटण्याचा सोहळा साजरा केला जातो व हा सोहळा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. श्री शारदा देवीचा नवरात्रोत्सव अत्यंत सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शारदा देवी ट्रस्ट व ग्रामस्थांच्या वतीने सध्या जयत तयारीची लगबग सुरू असून सर्वांचे सहकार्य लाभत आहे.