ईव्हीएम-व्हीव्हीपॅट जनजागृती मोबाईल व्हॅनचे उद्घाटन !

जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते शुभारंभ
Edited by: देवयानी वरसकर
Published on: December 20, 2023 16:39 PM
views 55  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हयातील प्रत्येक मतदान केंद्रावर तसेच ग्रामपंचायत कार्यालय येथे मोबाईल व्हॅनव्दारे ईव्हीएम- व्हीव्हीपॅट मशीन्सचा वापर व कार्य याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या हस्ते मोबाईल व्हॅनच्या उद्घाटनाने झाला. या जनजागृती मोहिमेत ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन्सबाबत मतदारांना संपूर्ण माहिती देण्यात येणार असून ही माहिती देण्यासाठी कर्मचारी वर्ग देखील नियुक्त करण्यात आलेला आहे  


आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूक-2024 च्या अनुषंगाने ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन्सचा वापर व कार्याबाबत जनजागृती मोहिम 29 फेब्रुवारी 2024 पर्यंत मोबाईल प्रात्यक्षिक व्हॅनव्दारे राबविण्यात येणार आहे. तसेच जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात EVM प्रात्यक्षिक केंद्र (EDC) स्थापन करण्याबाबत देखील भारत निवडणूक आयोग, नवी दिल्ली व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांनी सूचना दिलेल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग व मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कणकवली, कुडाळ, सावंतवाडी यांच्या कार्यालयात EVM प्रात्यक्षिक केंद्राची 10 डिसेंबर 2023 रोजी स्थापना करण्यात आलेली असून मतदारांना ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन्सचा वापर व कार्याबाबत माहिती देण्यासाठी प्रात्यक्षिक केंद्रात प्रशिक्षीत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जिल्हयातील मतदारांनी जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग व मतदार नोंदणी अधिकारी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी यांच्या कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या ईव्हीएम-व्हीव्हीपॅट मशीन्सबाबतची माहिती घ्यावी तसेच  जनजागृती मोहिमेत मोठया प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणुक अधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे.