
दोडामार्ग: हिरव्यागार निसर्गाच्या साक्षीने वनराईचा सुगंध दरवळणाऱ्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा तळकट क्र. १ येथे “वन्यजीव संरक्षण” या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम वनविभाग आणि जि. प. शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपल्या लेखणीद्वारे वन्यजीवांविषयीची संवेदनशीलता आणि निसर्गप्रेम व्यक्त केले. स्पर्धेत मानस कृष्णकांत राणे याने प्रथम,, इशीका धनंजय धुरी हिने द्वितीय व रोहित विजय मळीक याने तृतीय क्रमांक पटकाविला. विजेत्यांना वनपाल किशोर जंगले, मुख्याध्यापक जनार्दन पाटील व वनरक्षक यांच्या हस्ते रोख बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी वनपाल जंगले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत सांगितले की, वन्यजीवांनाही आपल्या प्रमाणे जगण्याचा आणि जंगलात राहण्याचा अधिकार आहे. आपण त्यांच्या निवाऱ्यावर अतिक्रमण केल्यास त्यांचे अस्तित्व धोक्यात येते आणि ते मानव वस्तीत प्रवेश करू लागतात. त्यांच्या विचारपूर्ण मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना निसर्ग संवर्धनाचे बाळकडू लाभले.
मुख्याध्यापक पाटील यांनी वनाधिकारी यांनी आयोजित केलेल्या उपक्रमाचे स्वागत करत यापुढेही अशा वन्यजीव जनजागृतीसाठी शाळा स्तरावर विविध उपक्रम राबविण्याचा मनोदय व्यक्त केला.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करून शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. या वेळी वनरक्षक तसेच शाळेचे शिक्षक गोरख जगधने आणि कमलाकर राऊत हे ही उपस्थित होते.










