
चिपळूण : परशुराम एज्युकेशन सोसायटी संचलित सुरेश दामोदर गद्रे इंग्लिश मिडीयम स्कूल, चिपळूण येथे दिनांक २८ जुलै २०२५ रोजी जागतिक निसर्ग संवर्धन दिन विविध उपक्रमांद्वारे उत्साहात व प्रेरणादायी पद्धतीने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात माध्यमिक विभागाचे सहाय्यक शिक्षक श्री. तुषार जाधव यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून देत केली. यावेळी सेवासाधना प्रतिष्ठान, केतकी (चिपळूण) येथील सेक्रेटरी आणि पेशाने इंजिनिअर श्री. विनीत वाघे यांचा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पद्मजा येसादे आणि पर्यवेक्षिका सौ. सविता कर्वे यांच्या हस्ते रोप व मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
प्रमुख वक्ते श्री. वाघे यांनी “पृथ्वीची निर्मिती आणि मानवाची उत्क्रांती” या विषयावर पीपीटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सविस्तर व प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांच्या सादरीकरणातून पृथ्वीच्या जन्मापासून ते पर्यावरणीय संकटांपर्यंतचा प्रवास विद्यार्थ्यांना समजायला मदत झाली. यासोबतच, कार्यक्रमात विविध प्रकारच्या दगडांचे शैक्षणिक व आकर्षक प्रदर्शनही विद्यार्थ्यांच्या माहितीप्राप्तीसाठी मांडण्यात आले होते.
विनीत वाघे यांनी आपल्या भाषणात सांगितले, “जर आपण आत्ताच निसर्ग रक्षणाचे पावले उचलली नाहीत, तर येणाऱ्या पिढ्यांना निसर्गाचा कोपच भोगावा लागेल. प्रत्येकाने पर्यावरणसंवर्धनाचे भान ठेवत जबाबदारीने वागले पाहिजे.”
या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन सहाय्यक शिक्षिका व कार्यक्रम विभाग प्रमुख सौ. स्नेहा भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. तुषार जाधव यांनी केले, तर सौ. जान्हवी लाड यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाला शाळेचे सर्व पदाधिकारी, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. सर्वांच्या सहकार्याने निसर्गसंवर्धनाचा हा संदेश देणारा उपक्रम अत्यंत यशस्वीपणे पार पडला.