
मंडणगड : सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात नुकताच विज्ञान विभागाच्या वतीने ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ. सूरज बुलाखे होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहूल जाधव होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. वाल्किम परहर, डॉ. मुकेश कदम, प्रा. संदिप निर्वाण, डॉ. संगीता घाडगे, प्रा. शरिफ काझी, आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले, सी. व्ही. रामण व लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी प्रा. संदीप निर्वाण यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन उपस्थित सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. सूरज बुलाखे म्हणाले की विज्ञानाच्या नवनवीन शोधामुळे समाजाच्या विकासाला चालना मिळाल्यामुळे मानवी जीवन सुखी बनले आहे. त्याकरिता आपल्यामध्ये विज्ञानातील विविध घडामोडी जाणून घेण्याची मानसिकता तयार होणे गरजेचे आहे. कारण निसर्गातील कोणत्याही प्रकारच्या घटनेमागे एक वैद्यानिक दृष्टिकोन असतो. विज्ञानाने अनेक क्षेत्रामध्ये प्रगती केली असली तरी त्याचबरोबर निसर्गाचा समतोल राखणेही आवश्यक आहे .विज्ञानाव्दारे प्रगती करत असताना निसर्गावर अतिक्रमण होणार नाही याची काळजी घेण्याची खरी गरज आज आहे. याकरिता समाजामध्ये जागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांनी सांगितले की विज्ञानाचा उगम जिज्ञासेतून होतो. वास्तुनिष्ट सत्याच्या शोधासाठी संशोधन करणे म्हणजे विज्ञान होय. वैद्यानिक प्रगतीचा लाभ आज सर्वच क्षेत्रात झाल्याचे आपल्याला पाहवायास मिळते. विज्ञानाच्या नवनवीन शोधामुळे जगाची प्रगती मोठया प्रमाणात झाली असून आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आपणास पाहवयास मिळतो तो एक विज्ञानाचा चमत्कारच आहे. याचबरोबर त्यांनी ‘राष्ट्रीय विज्ञान दिना’चे महत्व सांगून विज्ञान क्षेत्रातील भारतीय शास्त्रज्ञांचे योगदानाबद्दलही थोडक्यात माहिती सांगितली.
यावेळी डॉ. मुकेश कदम, प्रा. संदीप निर्वाण, प्रा. सूरज बुलाखे, प्रा. शरिफ काझी यांच्या मारदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या वतीने विज्ञान प्रदर्शन व पोस्टर प्रदर्शन भरविण्यात आले होते. दैनंदिन जीवनात उपयोजित विज्ञानाचा कसा वापर होतो हे विद्यार्थ्यांनी त्याचे प्रात्यक्षिक व फलकाद्वारे सांगितले. याचा महाद्यिालयातील सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांनी केले.
तसेच राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजूषा स्पर्धेचेदेखील आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेकरिता राज्यातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सदर कार्यक्रमास शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मुकेश कदम यांनी तर आभार प्रा. शरिफ काझी यांनी मानले.