
सावंतवाडी : राष्ट्रीय मिल मजदूर संघ घराच्या प्रश्नांवर राज्यभर कामगार व वारसांच्या सभा घेणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरूवार दि.१७ एप्रिल रोजी सावंतवाडी येथे सकाळी आणि कणकवली येथे दुपारी सभा घेणार आहे, असे राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपाध्यक्ष रघुनाथ उर्फ अण्णा शिर्सेकर यांनी सांगितले.
रखडलेला गिरणी कामगार घरांचा प्रश्न तागडतोब मार्गी लागावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व संबंधितांची त्वरीत बैठक बोलावावी, अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिन अहिर आणि सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी दिले होते. परंतु अद्यापतरी या प्रश्नावर बैठक बोलवण्यात आली नाही. यावरून सरकारची या प्रश्नावर अनास्था दिसून आली आहे. शिवाय कामगारांचीही या प्रश्नावरील प्रतिक्षा संपुष्टात आली असून सर्वत्र असंतोष खदखदून आलेला दिसतो आहे, ही गोष्ट लक्षात घेता राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने या प्रश्नावर महाआंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याची पूर्वतयारी म्हणून येत्या मंगळवार दि.१५ एप्रिल रोजी दु. ४ वाजता परेल येथील महात्मा गांधी सभागृहात कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांची सभा बोलवण्यात आली आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
मुंबई तसेच मुंबईलगतच्या उपनगरात कामगारांना घरे मिळालीच पाहिजे, ही महत्त्वपूर्ण मागणी डोळ्यासोर ठेऊन आंदोलनाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. आंदोलानाला मुंबईसह राज्यातील खेडेगावामधील गिरणी कामगारांचा आणि त्यांच्या कुटुबियांचा पाठिंबा लाभावा यासाठी येत्या १७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता 'सावंतवाडी' मध्ये काझी शहाद्दिन हॉल आणि दुपारी ३.३० वा. 'कणकवली' येथे कामगार व त्यांच्या वारसांची पहिलीच सभा आयोजित करण्यात आली आहे, असे अण्णा शिर्सेकर यांनी स्पष्ट केले.
तसेच दि. १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वा. 'राजापूर' येथे आणि दुपारी ३.३० वा. 'लांजा' येथे आणि १९ एप्रिल रोजी 'चिपळूण' येथे सकाळी ११ वा. गिरणी कामगार व त्यांच्या वारसांची सभा बोलविण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
पश्चिम महाराष्ट्रातील गिरणी कामगार आणि वारसांमध्ये हि जनजागृती निर्माण व्हावी यासाठीही या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत. घरांसाठी जवळपास १ लाख ७५ हजार कामगारांनी फॉर्म भरले आहेत. फॉर्म भरलेल्या कामगारांपैकी गेल्या १५ वर्षात १८ हजार घरे गिरणी कामगारांना मिळालेली आहेत. याचा अर्थ एका वर्षात जर १ हजार घरे कामगारांना मिळाली असे मानले तर १ लाख ५० हजार कामगारांना घरे मिळण्यास किती वर्षे लागतील ? याचा अर्थ घरे मिळण्यासाठी सरकारने मंदगतीचे धोरण स्वीकारले होते. ही गोष्ट लक्षात घेता या प्रश्नावर आता सरकारने कालबध्द कार्यक्रम आखला पाहिजे, अशी आमची मागणी असून तरब सर्व कामगारांना त्वरित घरे मिळतील.गिरणी कामगारांना घरे मुबंईतच मिळाली पाहिजे, या मागणीला आता जोर वाढू लागला आहे. ही गोष्ट लक्षात घेता सरकारच्या मानसिकतेत बदल होऊन शासनाने सकारात्मक पाऊल उचलावे ही अपेक्षा व्यक्त काण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गिरणी कामगार व वारस यांनी गुरुवार दि.१७ एप्रिल रोजी सकाळी सावंतवाडी व दुपारी कणकवली येथे बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा गिरणी कामगार संघाचे अध्यक्ष शाम कुंभार यांनी केले आहे. यावेळी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपाध्यक्ष रघुनाथ उर्फ अण्णा शिर्सेकर व मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत असे त्यांनी सांगितले.