
देवगड : देवगड तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन शनिवार दि. ०७ डिसेंबर २०२४ रोजी दीक्षित फाउंडेशन शैक्षणिक विचार मंच व अनंत कृष्ण केळकर हायस्कूल,वाडा यांच्या संयुक्त विद्यमाने अनंत कृष्ण केळकर हायस्कूलच्या स्व.नीलकंठ श्रीधर तथा बाळासाहेब दीक्षित क्रीडांगणावर करण्यात आले होते. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम माजी आमदार ऍड.अजित गोगटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
हा कार्यक्रम वाडा हायस्कूलचे मुख्याध्यापक सुनील घस्ती यांच्यासुनियोजितमार्गदर्शनाखाली संपन्न झाला.अध्यक्षीय भाषणात बोलताना ऍड. अजित गोगटे यांनी देवगड तालुका हा शैक्षणिक संपन्नतेबरोबरच क्रीडाप्रकारातही चमकत आहे, अनेक राज्यस्तरीय,राष्ट्रीय खेळाडू देवगड तालुक्याने दिलेले आहेत.दीक्षित फाउंडेशन शैक्षणिक विचार मंच आणि अनंत कृष्ण केळकर हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या स्पर्धांमुळे पुन्हा एकदा देशी खेळांना उर्जितावस्था प्राप्त होईल.खो-खो सारख्या खेळातही देवगडातील राष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू तयार होतील असे मत मांडले. याबरोबरच प्रशांत वारीक, हर्षद जोशी यांनी आपली मनोगते मांडली.या स्पर्धेमध्ये मुलांच्या गटात श्रीराम मोरेश्वर गोगटे हायस्कूल जामसंडे प्रथम क्रमांक, मुटाट हायस्कूल द्वितीय क्रमांक, अ.कृ.केळकर हायस्कूल वाडा तृतीय क्रमांक तर पडेल हायस्कूलने चतुर्थ क्रमांक प्राप्त केला. मुलीच्या गटात जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा पाळेकरवाडी, द्वितीय क्रमांक पडेल हायस्कूल, तृतीय क्रमांक जामसंडे हायस्कूल तर चतुर्थ क्रमांक वाडा हायस्कूलने प्राप्त केला.
यशस्वी संघांना रोख रक्कम व चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण दातार यांनी केले, तर बक्षीस वाचन व आभार प्रदर्शन हिराचंद तानवडे यांनी केले.यावेळी तालुका कबड्डी असोसिएशनचे सचिव प्रशांत वारीक, दीक्षित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निरंजन दीक्षित, स्थानीय समिती अध्यक्ष शांताराम पुजारे, शैक्षणिक विचार मंचाचे विकास दीक्षित, हिराचंद तानवडे, जिल्हा खो-खो फेडरेशनचे पेंडूरकर, वाडा हायस्कूल शाला समितीचे अध्यक्ष हर्षद जोशी, स्थानीय समितीचे कार्यवाह दिनकर जोशी, कुणकेश्वर हायस्कूलचे मुख्याध्यापक माधव यादव, परब, वेलणकर आदी मान्यवर आदी उपस्थित होते.