
मालवण : अखेर शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी नवनिर्वाचित खासदार तथा माजी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांची आज मालवण येथील निलरत्न निवासस्थानी भेट घेत शुभेच्छा दिल्या. तसेच शहरातील समस्यांबाबत खा. राणे यांचे लक्ष वेधले.
लोकसभा निवडणुकीत उबाठा पक्षाला शहरात मतदान घटले याला आमदार, खासदारच जबाबदार असल्याचा आरोप करत मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पक्षाला घरचा आहेर दिला होता. नगरपरिषद प्रशासक यांच्यावर कोणाचाही अंकुश नाही. आमदार, खासदार यांना सांगूनही त्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप कांदळगावकर यांनी केला होता. शहरातील समस्यांबाबत नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले होते.
खासदार झाल्यानंतर प्रथमच मालवण दौऱ्यावर आलेल्या माजी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे मालवणात जंगी स्वागत करण्यात आले. खा. राणे यांना शुभेच्छा देण्यासाठी मालवण येथील निलरत्न निवासस्थानी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. सायंकाळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनीही खासदार राणे यांची भेट घेत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच शहरातील समस्यांचे निवेदन देत राणे यांचे लक्ष वेधले.