
सावंतवाडी : महाराष्ट्र-गोवा सीमेवरील बांदा गावाच्या प्रवेश द्वारावर 'एकच नारा' अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले असून कोकणचे नेते, माजी केंद्रीय मंत्री, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा फोटो या बॅनरवर आहे. त्यामुळे मुंबई-गोवा हायवेवरील हा बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे.
या बॅनरवर एकच नारा असा आशय लिहित 'ना' म्हणजे नारायण तर 'रा' अर्थात राणे असं संबोधलं गेलं आहे. गेली ४ दशक नारायण राणेंच सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकहाती वर्चस्व राहिले आहे. आजही नारायण राणेंच्या अवतीभवती जिल्ह्याच राजकारण फिरत आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ते विद्यमान खासदार आहेत. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत भारतीय जनता पार्टीसह महायुतीतील घटकपक्ष शिवसेनेला मोठं यश प्राप्त झालं आहे. त्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका कोणत्याहीक्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावर लागलेले हे बॅनर राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.









