
सावंतवाडी : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यानी आदरांजली अर्पण केली आहे. याबाबतची पोस्ट करताना माजी मुख्यमंत्री नारायण राणे भावनाविवश झाले.
नारायण राणे यांनी पोस्ट मधून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. ते म्हणाले, ''आज साहेबांचा जन्मदिवस. साहेबांची आठवण नाही असा एकही दिवस जात नाही. त्यांचे माझ्या जीवनातील स्थान अढळ आहे. साहेबांच्या पुण्यस्मरणासाठी मी माझे आत्मचरित्र 'झंझावात' मधील एक उतारा उद्धत करतो.
"साहेबांच्या पार्थिवाचे दर्शनही माझ्या नशिबात असू नये ही माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी खंत आहे. साहेब आणि माँसाहेब माझ्यासाठी सर्वस्व होते. साहेबांच्या निधनाने माझ्या मनातला एक कोपरा निष्प्राण झाला. आजही मला विचाराल की, या जगातली माझी सर्वात प्रिय व्यक्ती कोण आहे, तर मी बेधडकपणे 'बाळासाहेब ठाकरे' हेच एक नाव घेईन. ते माझ्यासाठी माझं जग होते आणि राहतीलही. माझ्या आयुष्यात कितीही चढउतार येऊ देत, मी आज जो कोणी आहे, त्यामागे त्यांचाच आशिर्वाद आहे हे मी आयुष्यात कधीही विसरु शकणार नाही" अशा भावना नारायण राणे यांनी व्यक्त केल्यात.