
सावंतवाडी : सावंतवाडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नामकरण माजी आमदार जयानंद मठकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावंतवाडी असे करण्यात आले. याचे मठकर कुटुंबातील सदस्य आणि समाजवादी पक्षाचे हितचिंतक आदींच्या उपस्थितीत व शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते नामकरण करण्यात आले.
सावंतवाडी कोलगाव येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नामकरण जयानंद मठकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे केल्यानंतर मंत्री दीपक केसरकर म्हणाले, माझ्या जडणघडणीत सावंतवाडी संस्थानचे राजे शिवरामराजे भोसले यांची प्रेरणा घेऊन मी समाजकारण आणि राजकारणात आलो. तर जयानंद मठकर यांनी आयुष्यभर समाजवादी तत्वांचे पालन केले. मी कै. मठकर यांचा सल्ला कायमच घेऊन काम केले. त्यांनी रस्ता आणि विडी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यातील शेवटच्या क्षणापर्यंत कार्य केले. सावंतवाडी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नामकरण जयानंद मठकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे करताना आनंद होत आहे.
यावेळी श्रीराम वाचन मंदिरचे कार्याध्यक्ष रमेश बोंद्रे म्हणाले, समाजवादी विचारसरणीच्या आमच्या सारख्या जयानंद मठकर यांच्यासोबत काम करणाऱ्यांना आनंद होत आहे. माजी आमदार जयानंद मठकर यांचे नातू मिहीर मठकर म्हणाले, माझे आजोबा कै. जयानंद मठकर यांचे स्मारक उभारले पाहिजे अशी अपेक्षा होती. पण काही अडचणींमुळे ते शक्य झाले नाही. मात्र महाराष्ट्र सरकार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी जयानंद मठकर यांचे कार्याची ओळख औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नामकरण करून चिरंतन ठेवली आहे. याचा परिवारातील सर्वांना आनंद झाला आहे.यावेळी डॉ. जी ए बुवा, रमेश बोंद्रे ,बाळ बोर्डेकर ,प्रसाद पावसकर , मिलिंद मठकर, सीमा मठकर ,नंदू तारी , मिहीर मठकर ,सुभाष शिरसाट ,भूषण बांदिवडेकर, तसेच मठकर यांची कन्या आणि परिवार तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुका प्रमुख नारायण राणे,देव्या सूर्याजी आदी उपस्थित होता. यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य सुचिता वंजारी नाईक यांनी आपल्या सहकारी विद्यार्थी शिक्षकांसह शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे स्वागत केले आणि नामफलक अनावरण प्रसंगी सर्वांना शुभेच्छा दिल्या.