वैभववाडी-सडुरे मार्गाला शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांचे नाव द्या ! - प्रमोद रावराणे यांची आ. नितेश राणेंकडे मागणी

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: March 24, 2023 17:50 PM
views 213  views

वैभववाडी : शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांचे नाव वैभववाडी-सडुरे मार्गाला द्यावे. शहरातील दत्त मंदिर येथे प्रवेशद्वार बांधून त्याचे नामकरण करावे, अशी मागणी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी आमदार नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शहीद कौस्तुभ रावराणे हे तालुक्यातील सडुरे गावचे सुपुत्र होते. सन २०१३ ला ते सैन्यात दाखल झाले. उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांची सैन्यदलात पदोन्नती झाली. मेजर झाल्यावर श्री. रावराणे हे काश्मीरमधल्या गुरेज सेक्टरमध्ये कार्यरत होते. या भागात दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचे ऑपरेशन सुरू होते. कौस्तुभ त्या मोहिमेचा एक महत्त्वाचा भाग होते. या मोहीमेदरम्यान ७ ऑगस्ट २०१८ रोजी दहशतवादी हल्ल्यात ते शहीद झालेत. तालुक्याच्या सुपुत्राने देशाकरिता दिलेले हे बलिदान  सा-यांच्या स्मरणात राहावे, त्यांचे नाव वैभववाडी-सडुरे मार्गाला देण्यात यावे, अशी मागणी प्रमोद रावराणे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी आमदार राणे यांना दिले आहे.