नागपूर - मडगाव एक्सप्रेसला सावंतवाडीत थांबा

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या लढ्याला यश
Edited by: विनायक गांवस
Published on: December 28, 2024 19:30 PM
views 914  views

सावंतवाडी :  नागपूर-मडगाव एक्सप्रेसला सावंतवाडी थांबा मंजूर करण्यात आला आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून गेली अडीच वर्षे यासाठी पाठपुरावा करत लढा उभारला होता. अखेर प्रवासी संघटनेच्या लढ्याला यश आले असून नागपूर-मडगाव एक्सप्रेसला सावंतवाडी थांबा मंजूर करण्यात आला आहे.

गेले काही वर्षे कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी ही सावंतवाडी स्थानकात असणाऱ्या सुविधांसंदर्भात वेळोवेळी संबंधित प्रशासनाकडे दाद मागत होती. नागपूर मडगाव एक्स्प्रेस सावंतवाडी स्थानकात थांबावी यासाठी अथक प्रयत्न करत होती. ही गाडी काही वर्षापूर्वी या स्थानकात थांबत होती. सावंतवाडी स्थानकातून अपेक्षित प्रवासी संख्या आणि उत्पन्न या गाडीतून मिळत असताना देखील या स्थानकातून या गाडीचा थांबा रद्द करण्यात आला होता. त्यामुळे संघटनेने येणाऱ्या प्रजासत्ताक दिनी रेल रोको करू अशी नोटीस देखील प्रशासनाला दिली होती. त्यामुळे या संदर्भात कोकण रेल्वे प्रशासनाने याची दखल घेत सावंतवाडी स्थानकात हा थांबा मंजूर केला आहे.हा थांबा मंजूर करण्यासाठी कोकण रेल्वे महामंडळाचे क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक  शैलेश बापट यांनी कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीला सहकार्य केले.

संघटने तर्फे अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर, मिहिर मठकर, विनोद नाईक, भूषण बांदिवडेकर, सागर तळवडेकर, सुभाष शिरसाट यांनी आमदार दीपक केसरकर, खासदार नारायण राणे आणि प्रशासनाचे आभार मानले आहेत