
सावंतवाडी : राज्यातील सर्व नगरपरीषदा आणि नगरपंचायती मधील कर्मचारी उद्यापासून कामबंद करणार आहेत. 6 ऑगस्ट पासून "कामकाज बंद आंदोलन तसेच 7 ऑगस्ट रोजी आयुक्त तथा संचालक नगरपरिषद प्रशासन संचालनालय बेलापूर नवी मुंबई ते मंत्रालय मुंबई यादरम्याने "लॉंगमार्च" काढण्यात येणार आहे. तरीही अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यास 9 ऑगस्ट 2024 पासून "आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग नाटेकर यांनी दिली आहे.
ते म्हणाले, संघटनेचे सर्व पदाधिकारी शासन दरबारी सर्व कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करून घेण्याबाबत जातीनिशी प्रयत्न करीत आहेत. शासनाने वेळोवेळी मागण्या मान्य करण्या बाबत चाल ढकल केलेली आहे. शासन म्हणजे आपलेच अधिकारी ज्यांनी सर्व लाभ आपल्या पदरात पाडून घेतलेत. परंतु त्यांच्याच अधिपत्याखालील नगरपरिषद कर्मचाऱ्यांना ते लाभ देण्यासाठी चालढकल करीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी सर्व लाभ देण्याबाबत मंजुरी दिलेली असून देखील आपलेच अधिकारी त्याला हरताळ फासत आहेत. अशा अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आता "काम बंद आंदोलन आणि लॉंगमार्च" काढण्यात येणार आहे. तरी देखील त्यांच्यावर परिणाम झाला नाही तर 9 ऑगस्ट 2024 पासून "आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे असं नाटेकर यांनी म्हटले आहे.