
सावंतवाडी : विधानसभा निवडणूकीत सर्वांनी एकजुटीने व एकदिलाने प्रचार करण्यासाठी एकत्रित नियोजन करण्यासंदर्भात आजची महायुतीची बैठक पार पडली. महायुतीच्या उपस्थित सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्या संदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची पालकमंत्र्यांसोबत पुन्हा बैठक होणार आहे. त्यानंतर सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते अधिक जोमाने कामाला लागतील असा विश्वास महायुतीचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील सर्व पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची तसेच सरपंच उपसरपंच यांची समन्वयाची बैठक पार पडली. यावेळी बैठकीला पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे यांनी मार्गदर्शन करीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीच्या प्रचारासंदर्भात सूचना दिल्या. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे काही कार्यकर्ते अन्य उमेदवारांसाठी काम करीत असल्याचे निदर्शनास आल्याने अशा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यात आली. अंतर्गत असलेले गैरसमज दूर करण्यात आल्यानंतर सर्वांनीच एक दिलाने काम करण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे महायुतीच्या या संघटित ताकदीमुळे माझा विजय निश्चित आहे असा विश्वासही श्री. केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी महायुतीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.