'माय' हरपली, नशिबी पोरकेपण..!

▪️ निराधार दिव्यांग भगिनींना मदतीचा हात द्या ! | सामाजिक बांधिलकीच आवाहन
Edited by: विनायक गांवस
Published on: June 16, 2024 10:09 AM
views 790  views

सावंतवाडी : बापाच्या निधनानंतर आईच्या पदराखाली वाढलेल्या दिव्यांग भगिनींच्या नशिबी अखेर  पोरकेपण आल आहे. माजगाव गरड ख्रिश्चनवाडी येथील या निराधार भगिनी आहेत. या तिनही भगिनी दिव्यांग असून आईच्या निधनानंतर त्यांचा आधार हरपला आहे. डोक्यावरचे छत्र हिरावल गेलं आहे. या कठीण प्रसंगात त्यांना आधाराची गरज आहे. 'माय' हरपली असताना समाजाकडून मदतीच्या हातांची माया त्यांना हवी आहे. उरलेलं आयुष्य जगण्याच सामर्थ्य त्यांना हवं आहे. यासाठी दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेत दिव्यांग भगिनींना आधारा द्यावा असं आवाहन सामाजिक बांधिलकीच्या रूपा मुद्राळे यांनी केल आहे. 

मायबाप हरपलेल्या या तीन दिव्यांग भगिनी आहेत. जाकलिन डिसोजा, आल्विन डिसोजा व डॉल्फिन डिसोजा अशी या भगिनींची नाव आहेत‌. तिघीही बहिणी मतिमंद आहेत. वीस वर्षांपूर्वीच त्यांच्या डोक्यावरून वडिलांच छत्र हरपल. यानंतर त्यांचा पूर्ण सांभाळ त्यांच्या मातेन केला. सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्ती रूपा मुद्राळे यांनी त्यांना गेली दहा वर्षे मदत केली. थकलेली आई शेवटच्या श्वासापर्यंत मुलींचं संगोपन करत होती. अशातच आईला मृत्यूनं गाठलं. काही दिवसांपूर्वी मुलींची आई मृत पावली. घरात अंथरूणावर निपचित पडलेली आई मृत असल्याची जाणीव त्यांना नव्हती. दोन दिवस जाग नसल्यानं शेजारच्यांनी चौकशी केली असता त्यांची आई या जगात नसल्याचं कळलं. यानंतर शेजाऱ्यांनीच धावाधाव करत त्यांच्या आईचा अंत्यविधी केला.

आईसोबत या तिघी बहिणी लोकांची धुणी-भांडी करायला जात. यातूनच त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. व्यवहारीक ज्ञान नसल्यानं प्रत्येक ठिकाणी आईचा आधार त्यांना लागायचा. आईच्या निधनानंतर त्यांची मानसिक स्थिती अजून खालवली आहे. तिच्या विरहान दिवस-रात्र त्या रडत आहेत. याप्रसंगात तिन्ही भगिनींना सामाजिक बांधिलकीच्या रूपा मुद्राळे, रवी जाधव यांसह शेजारच्या लोकांनी आधार व साथ दिली. सद्यस्थितीत रूपा मुद्राळे त्यांचा सांभाळत करत आहे. अशा अवस्थेमध्ये आधार देत तीनं माणुसकी जपली आहे. सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून संस्थेचे अध्यक्ष सतीश बागवे, उपाध्यक्ष शैलेश नाईक, सचिव समीरा खलील, कार्याध्यक्ष संजय पेडणेकर, रवी जाधव, सुजय सावंत, हेलन निबरे, श्याम हळदणकर, अशोक पेडणेकर, प्रसाद कोदे ,शरद पेडणेकर, शेखर सुभेदार या सर्व सामाजिक बांधिलकीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मदतीचा हात दिला आहे. परंतु, त्यांच्या पुढच्या जीवनासाठी मदतीचा हात हवा आहे. एकटेपणाच जीवन नशीबी आले असताना दिव्यांग भगिनींना मायेच छत्र हवं आहे. दानशूर व्यक्तींनी त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन  सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून  करण्यात आले आहे. 

मदतीसाठी संपर्क : रूपा मुद्राळे 9422633971 रवी जाधव 9405264027